Home / महाराष्ट्र / Sunetra Pawar : अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या नेतृत्वासाठी सुनेत्रा पवारांची होणार बिनविरोध निवड? पक्षांतर्गत हालचालींना वेग

Sunetra Pawar : अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या नेतृत्वासाठी सुनेत्रा पवारांची होणार बिनविरोध निवड? पक्षांतर्गत हालचालींना वेग

Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड येत्या एका महिन्याच्या आत करण्यासाठी हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर येत...

By: Team Navakal
Sunetra Pawar
Social + WhatsApp CTA

Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड येत्या एका महिन्याच्या आत करण्यासाठी हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कालावधीतच ही निवडणूक पक्षांतर्गत पद्धतीने पार पाडण्याचा विचार असून, राज्यातील पदाधिकारी तसेच राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्य यांच्या सहमतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड होण्याची दाट शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर ३१ जानेवारी रोजी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. शपथविधीपूर्वी त्यांनी पवार कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांची भेट घेऊन त्यांचा निरोप घेतल्याची माहिती देखील समोर आली आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीद्वारे सुनेत्रा पवार यांच्याशी संपर्क साधून सांत्वन व्यक्त केले होते.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाबाबत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाकडून अजित पवार यांच्याकडे प्रस्ताव येत असल्याची चर्चा होती. हे प्रस्ताव अजित पवार यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांपुढे मांडले होते. मात्र, अशा कोणत्याही एकत्रीकरणाबाबत निर्णय घेण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मत जाणून घेणे आवश्यक असल्याचे अजित पवार गटाला वाटत होते.

यासंदर्भात अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्याशी चर्चा करणार असल्याचे बोलले जात होते; तथापि, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उच्चपदस्थ सूत्रांच्या माहितीनुसार अशी कोणतीही चर्चा प्रत्यक्षात झालेली नव्हती. या पार्श्वभूमीवर, सुनेत्रा पवार लवकरच दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील अकाली निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या धक्कादायक घटनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाची धुरा कोणाकडे सोपवायची, याबाबत पक्षांतर्गत खलबते सुरू झाली असून, सुनेत्रा पवार यांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्त करावे, अशी आग्रही मागणी जोर धरू लागली आहे.

अपघाताची पार्श्वभूमी-
२८ जानेवारी रोजी सकाळी अजित पवार एका खाजगी विमानाने मुंबईहून बारामतीकडे जाण्यास निघाले होते. मात्र, सकाळी ८:४६ च्या सुमारास बारामती विमानतळावर लँडिंग करत असताना विमानाला भीषण अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत अजित पवारांसह अन्य पाच जणांचा मृत्यू झाला. या वृत्ताने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली. २९ जानेवारी रोजी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, ज्यासाठी लाखो समर्थक आणि सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.

नेतृत्वासाठी सुनेत्रा पवारांचे नाव चर्चेत-
अजित पवारांच्या निधनानंतर निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी पक्षातील आमदारांनी सुरुवातीला सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता. आता या मागणीला पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही पाठिंबा दर्शवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली ३० हून अधिक महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी एक पत्र तयार केले आहे. या पत्राद्वारे त्यांनी सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान करण्याची मागणी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे.

वरिष्ठ नेत्यांकडे साकडे-
सदर मागणीचे पत्र पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पाठवण्यात आले आहे. अजित पवारांचे विचार आणि पक्षाची ध्येयधोरणे पुढे नेण्यासाठी सुनेत्रा पवार या सक्षम असून, त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष एकसंध राहील, असा विश्वास या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या मागणीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत गोटात राजकीय हालचालींना वेग आला असून, पक्षश्रेष्ठी यावर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या