Supriya Sule : महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या १० रिक्त जागांसाठी निवडणुकीचे बिगुल वाजले असून, राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा चेहरा कोण असेल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ संपल्याने रिक्त झालेल्या या जागेवर, त्यांनीच पुन्हा निवडणूक लढवावी, असा आग्रही सूर आता आघाडीतील घटक पक्षांनी लावला आहे.
राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि काँग्रेसची एकमुखी मागणी-
उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा सभागृहात यावे, यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आणि काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘एक्स’ (ट्विटर) वर पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली. “उद्धवजी हे राज्यातील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा सभागृहाला आणि राज्याला मोठा फायदा होईल. त्यामुळे त्यांनी या निवडणुकीत सकारात्मक विचार करून उमेदवारी अर्ज भरावा,” अशी विनंती सुळे यांनी केली आहे.
दुसरीकडे, काँग्रेसनेही आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी हर्षवर्धन सपकाळ यांना ‘मातोश्री’वर धाडले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीचे स्वागत केले आहे. मात्र, त्यांनी एक पेचही समोर ठेवला आहे. “उद्धवजी लढणार असतील तर उत्तम, पण जर ते लढणार नसतील, तर महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल, यावर तातडीने चर्चा करावी लागेल. तसेच आगामी राज्यसभेच्या जागेबाबतही आताच स्पष्टता हवी,” असे वडेट्टीवार यांनी सुचवले आहे.
संख्याबळाचे गणित आणि पेच-
विधान परिषदेच्या एका जागेसाठी विजयाचा कोटा २८ मतांचा निश्चित करण्यात आला आहे. सध्याच्या पक्षीय बलाबलानुसार हे गणित महाविकास आघाडीसाठी आव्हानात्मक आहे:
महायुती: भाजप (१३१), एकनाथ शिंदे यांची शिवसेना (५७) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी (४०) यांचे एकूण संख्याबळ पाहता, महायुतीचे ८ उमेदवार सहज निवडून येऊ शकतात.
महाविकास आघाडी: काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांचे एकूण संख्याबळ ४६ आहे. या जोरावर त्यांचा एक उमेदवार विनासायास निवडून येऊ शकतो. मात्र, दुसऱ्या जागेसाठी त्यांना अतिरिक्त १० मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे, जे सध्याच्या राजकीय स्थितीत कठीण मानले जात आहे.
कार्यकाळ संपणारे १० प्रमुख आमदार-
या निवडणुकीत महत्त्वाच्या १० नेत्यांच्या जागा रिक्त होत आहेत, त्यामध्ये उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे (शिवसेना), शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी – शरद पवार गट), अमोल मिटकरी (राष्ट्रवादी – अजित पवार गट), गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, प्रवीण दटके, रमेश कराड (सर्व भाजप), तसेच राजेश राठोड (काँग्रेस) आणि प्रज्ञा सातव (काँग्रेस – राजीनामा) यांचा समावेश आहे.











