सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार? संजय शिरसाट यांचा मोठा दावा

Supriya Sule

Sanjay Shirsat on Supriya Sule | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) लवकरच केंद्रात मंत्री होतील आणि शरद पवार महायुतीमध्ये सामील होतील, असा दावा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि शिवसेनेचे (शिंदे गट) प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केला आहे. रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या एका विधानावर प्रतिक्रिया देताना त्यांनी हे दावे केले.

संजय शिरसाट यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेक राजकीय शक्यतांवर भाष्य केले. रोहित पवार यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना शिरसाट म्हणाले, “रोहित पवारांना माहित आहे की त्यांना महाविकास आघाडीसोबत (MVA) राहायचे नाही. त्यांचे आजोबा (शरद पवार) दुसरा मार्ग निवडत आहेत. त्यांचे काका (अजित पवार) आधीच दुसरीकडे गेले आहेत. सुप्रिया सुळे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली परदेशात जात आहेत. त्यामुळे त्यांना महाविकास आघाडीत राहणे रुचणार नाही.”

शिरसाट पुढे म्हणाले, “भविष्यातील राजकारण वेगळ्या प्रकारचे असेल. शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसू शकतात. सुप्रिया सुळे यांची केंद्रात मंत्री होण्याची इच्छा होती आणि ती पूर्ण होऊ शकते, हे नाकारता येत नाही. राजकारणात काहीही शक्य आहे.”

शरद पवार महायुतीत कधी सामील होणार, या प्रश्नावर शिरसाट म्हणाले, “पुढील महिन्याच्या 15 तारखेपर्यंत मोठी राजकीय उलाढाल होण्याची शक्यता आहे. मात्र, ही माहिती खरी की खोटी, याची खात्री नाही. पण लवकरच ‘शुभमंगल सावधान’ होईल.”

रोहित पवारांच्या विधानावर प्रतिक्रिया:

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. रोहित पवार यांनी नुकतेच प्रसार माध्यमांशी बोलताना, महाविकास आघाडीत योग्य सन्मान मिळाला तरच एकत्र लढू, अन्यथा स्वतंत्र निवडणूक लढू, असे विधान केले होते. या विधानावर बोलताना संजय शिरसाट यांनी वरील दावे केले.

सध्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत दहशतवादाविरोधात जगात भारताची बाजू मांडण्यासाठी भारत सरकारने एक शिष्टमंडळ नेमले आहे. या शिष्टमंडळात सुप्रिया सुळे यांचाही समावेश आहे. त्यामुळे या दोन्ही घटनांचा संबंध जोडत संजय शिरसाट यांनी सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होतील, असा दावा केला आहे.