Tapovan Tree- नाशिकच्या तपोवन साधुग्राम परिसरात कुंभमेळ्यासाठी वृक्षतोड (Tapovan Tree) करण्याच्या विरोधात वातावरण पेटलेले असताना मंत्री गिरीश महाजन यांनी झाडे तोडणारच ही भूमिका पुन्हा स्पष्ट करीत इतरत्र पर्यायी झाडे लावण्यासाठी 17 हजार रोपे हैदराबाद येथून खरेदी करणार असल्याचे सोशल मीडियावर पोस्ट केले. यामुळे संताप अधिकच वाढला असून, आता रात्रीही पर्यावरणप्रेमी झाडांच्या रक्षणासाठी तपोवन परिसरात गस्त घालणार आहेत. इतकेच नव्हे तर या वृक्षतोडीच्या विरोधात न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. गिरीश महाजन हे कितीही अट्टाहास करीत असले तरी विरोधकांच्या रेट्यामुळे त्यांना तपोवन येथे बांधण्यात येणार्या प्रदर्शन हॉलसाठी जारी केलेली निविदा मागे घ्यावी लागली.
पर्यावरणप्रेमी, नागरिक, मनसे आणि कलाविश्वासह विविध स्तरांतून वृक्षतोडीला जोरदार विरोध सुरू आहे. तरीही वृक्षतोड करून पर्यायी ठिकाणी झाडे लावायची यासाठी कुंभमेळ्याची जबाबदारी असलेले मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः हैदराबादच्या राजमुद्री येथे जाऊन 15 फुटांची तब्बल 15 हजार देशी झाडे निवडल्याची कबुली दिली. राजमुद्री येथून जी झाडे आणली जाणार आहेत त्यात पिंपळ, वड, जांभूळ, आंबा, लिंबू यांचा समावेश आहे. महाजन यांनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सिंहस्थ नगरी नाशिक येथे 15 हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. यासाठी वड, पिंपळ, जांभूळ अशा अनेक देशी प्रजातीची 15 फूट उंच वाढ झालेली रोपे हैदराबाद येथून मागवण्यात येणार आहेत. तपोवनातील 10 वर्षांच्या आतील वृक्षांची तोड न करता त्यांचे पुनर्रोपण करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. नाशिक शहरातील पेलीकन पार्क येथे आज वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी नियोजित जागेची मी पाहणी केली. या जागेसह शहरातील इतरही अनेक ठिकाणी लोकसहभागातून वृक्षारोपण करण्यात येणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळा डिजिटल व हरित कुंभमेळा असावा यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. प्रशासनाने नवी रोपे लावण्यासाठी दूरच्या जमिनीत खड्डे खणले. मात्र हे खड्डे एकमेकांच्या अगदी जवळ आहेत. शिवाय ते पाहिजे तितके खोल खणलेले नाहीत.
आज मनसेच्या चित्रपट सेनेनेही तपोवनात होणार्या वृक्षतोडीला विरोध करीत आंदोलन केले. यावेळी चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर म्हणाले की,जागतिक स्तरावर नाशिकची ओळख सिंहस्थ मेळा नगरी म्हणून आहे. आपल्या आध्यात्मिक अस्तित्वाची प्रचिती देणारा मेळा हा परंपरेनुसार होत आहे. मात्र त्याआडून इतर प्रदर्शनासाठी हॉल बांधण्यासाठी वृक्षांचा बळी देण्याचे क्रूर नियोजन शासकीय यंत्रणेने केले आहे. हा भ्रष्ट व मनमानी शासकीय कारभार फक्त जमीन लाटण्यासाठी आहे, धर्माच्या नावाने, जातीपातीचे राजकारण करून हे भ्रष्ट सरकार आपले हित साधत आहे. येथे बँक्वेट हॉल, प्रदर्शन केंद्र, रेस्टॉरंट बांधण्याची योजना आहे. महाजन यांच्यावर कोणाचाही विश्वास नाही. राज ठाकरे यांच्या या आवडत्या शहराला भकास करण्याचा यांचा डाव आहे. आम्ही साधू-महंतांचे स्वागत करतो. पण उरावर बसून आम्ही कुंभमेळा होऊ देणार नाही. या तपोवनातील एकही झाड आम्ही तोडू देणार नाही. असा प्रयत्न झाल्यास मनसेस्टाईलने हा डाव उधळून लावू. सरकारने झाडावर फुलल्या मारल्या आहेत. हे आई-वडिलांवर फुल्ल्या मारल्यासारखे आहे. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की पार्थ पवारांना जसे माफ केले तसे झाडांनाही माफ करावे. झाडे तोडण्याचा प्रयत्न झाला तर मनसे आंदोलन उभारेल.
तपोवनात गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करणारे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. तल्हा शाहीन गुलाम शेख यांनी ‘नवाकाळ’ ला सांगितले की, मंत्री महाजन यांनी विकास प्रकल्पाच्या निविदा रद्द न करता स्थगित केल्या आहेत. परंतु केंद्र किंवा राज्य सरकार निर्णय स्थगित करतात आणि आंदोलन शिथिल झाले की, कोणत्यातरी मार्गाने तो निर्णय पुन्हा आणतात. त्यामुळे निर्णय जोपर्यंत पूर्णपणे रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे. या प्रकल्पाला आमचा विरोध आहे. झाडांची कत्तल होऊ नये, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. महाजन यांनी हजार झाडे लावण्यासाठीचा जो निर्णय दिला आहे तो हास्यास्पद आहे. त्यांनी लोकशाहीची थट्टा मांडली आहे.
शासनाने हजार झाडे लावण्याच्या निर्णयाला कोणाचाही आक्षेप नाही. मात्र झाडे लावली म्हणजे वृक्षतोडीची परवानगी मिळते, असे नाही. त्यांनी गंगापूर गाव, कानिटकर उद्यान परिसरात खड्डे खोदले आहेत. परंतु त्या खड्ड्यांमध्ये अत्यंत कमी अंतर आहे. एक फुटाचे झाडही तेथे लावता येणार नाही. त्याचबरोबर खड्डे खोदले आहेत तिथे उच्च विद्युत प्रवाह वाहून नेणारी विजेची तार आहे. लावलेली झाडे जगवणे ही सरकारची भूमिका नाही. आंदोलक आजपासून रात्रीपण पहारा देणार आहेत. कारण आमचा शासन -प्रशासनावर विश्वास नाही. आरे जंगलतोडीचा अनुभव सर्वांना आहे. भाजपा आणि पालिका प्रशासन सोडून सर्वांचा तपोवन वृक्षतोडीला विरोध आहे. जर शासनाने वृक्षतोडीचा हट्ट केला तर आम्ही चिपको आंदोलन करू. नाशिककर त्यासाठी तयार आहेत.
——————————————————————————————————————————————————
हे देखील वाचा –
शिवसेना- राष्ट्रवादी भाजपाच्या ताटाखालचे मांजर!वडेट्टीवारांची टीका
स्वराज्य संस्था निवडणूक याचिकांची ९ डिसेंबरला एकत्रित सुनावणी होणार
सरकारच्या हातातील कठपुतळी बनू नका; खा. प्रियंका चतुर्वेदींचा राष्ट्रपतींना सल्ला









