अखेर टेस्लाची भारतात एन्ट्री! ‘या’ तारखेला मुंबईत पहिले शोरूम उघडणार, Model Y ची करणार विक्री

Tesla Mumbai Showroom

Tesla Mumbai Showroom | इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपनी टेस्ला (Tesla India) लवकरच भारतीय बाजारात पदार्पण करणार आहे. कंपनीने नव्या एक्स पोस्टद्वारे “लवकरच येत आहे” असे संकेत दिले आहे.

कंपनी येत्या 15 जुलै 2025 रोजी मुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम (Tesla Mumbai Showroom) उघडणार आहे. या निर्णयाने जगातील तिसऱ्या मोठ्या कार बाजारात टेस्लाची अधिकृत एन्ट्री होणार आहे, तर ऑगस्ट अखेरीस Model Y SUV ची डिलिव्हरी सुरू होण्याची शक्यता आहे.

हे शोरूम, ज्याला “टेस्ला एक्सपीरियन्स सेंटर” म्हणून ओळखले जाईल, सुरुवातीला व्हीआयपी आणि व्यावसायिक भागीदारांसाठी खुले होईल. पुढील आठवड्यात सामान्य लोकांना प्रवेश मिळण्याची अपेक्षा आहे. येथे ग्राहक मॉडेल पर्याय, किमती तपासून ऑर्डर करू शकतील.

टेस्लाने जानेवारी ते जून 2025 दरम्यान $1 दशलक्ष किमतीची वाहने आणि चार्जर भारतात आयात केले आहेत, ज्यात Model Y SUV चा समावेश आहे. मात्र, 70% आयात शुल्कामुळे वाहनांची किंमत अमेरिकेपेक्षा जास्त होईल. मॉडेल वाय भारतात उपलब्ध झाल्यानंतरच गाडीची अधिकृत किंमत समजू शकेल.

विक्री कमी होत असलेल्या बाजारात नवीन संधी शोधणाऱ्या टेस्लाने भारतात भरती वाढवली आहे. कंपनीकडून स्टोअर मॅनेजर, सेवा कर्मचारी आणि सप्लाय चेन इंजिनिअर्सची नियुक्ती केली जात आहे. टेस्लाच्या भारतीय बाजारातील एन्ट्रीमुळे इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील इतर कंपन्यांना जोरदार टक्कर मिळणार शक्यता आहे.