TET Exam : टीईटी परीक्षेची सक्ती आणि अतिरिक्त शिक्षक समायोजनाच्या निर्णयाच्या विरोधात आज राज्यभरातील शिक्षक रस्त्यावर उतरल्याचे चित्र आहे. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, अमरावती, अहिल्यानगर, नांदेड आणि सांगलीसह अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात मोर्चे आणि निदर्शने करण्यात आली आहेत. कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेशाच्या मुद्द्यावरून शिक्षक आणि पोलिसांमध्ये मोठी बाचाबाची तसेच धक्काबुक्की देखील करण्यात आली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण देखील होते.
२०१३ पासून सर्व शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा सक्ती करण्यात आली. त्यानंतर या अंतर्गत शिक्षकांची भरती देखील झाली. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने ५३ वर्षांखालील सर्व शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य केल्याने शिक्षकांमध्ये नाराजी आणि भीतीचे वातावरण आहे. राज्य सरकारने तत्काळ पुनर्विचार याचिका दाखल करून शिक्षकांची बाजू कोर्टात मांडावी, अशी प्रमुख मागणी आता शिक्षकांकडून होत आहे. या आंदोलनात शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा देखील मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. शिक्षकांनी इशारा दिला की, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र होईल, एक दिवसाचा नव्हे तर महिनाभराचा पगार कापला तरी आता मागे हटणार नाही असे म्हणत यावेळी शिक्षक मात्र चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. या मागण्यांमध्ये टीईटी निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करणे, जुनी पेन्शन योजना त्वरित लागू करणे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुरू करणे यांचा समावेश आहे.
मुंबईतील शिक्षण उपसंचालक कार्यालयावर भेट देऊन माजी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी टीईटी सक्ती रद्द करण्याची मागणी केली आहे. कपिल पाटील म्हणाले की, राज्यातल्या २५ हजार शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थाचालक आज संपावर आहेत. टीईटीचा निर्णय जो सुप्रीम कोर्टाने घेतला आहे त्याला राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघेही जबाबदार असलयाचे ते म्हणतात.
पूर्वलक्षी प्रभावाने जर हा निर्णय राबवलात तर देशातले लक्षावधी शिक्षक हे घरी जातील त्यांच्या नोकऱ्या संपतील पेन्शन जाईल सगळं जाईल आणि शिक्षण व्यवस्था कोलमडून पडेल शिक्षणास समवर्ती सूचीतला विषय असल्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की त्यांनी तातडीने पुनर्विचार याचिका दाखल करावी किंवा स्वतंत्र कायदा करावा तो करता येणे देखील सहज शक्य आहे असे ते म्हणाले. त्यामुळे आता सरकार यावर काय तोडगा काढणार हे पाहणे देखील तितकेच महत्वाचे ठरणार आहे.
हे देखील वाचा – Mumbai News : वरळीत भाजप – ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने; वरळीत तुफान राडा








