MNS- Shiv Sena Alliance | राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिलेल्या हाकेला उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) तात्काळ प्रतिसाद दिल्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेच्या (MNS) युतीच्या चर्चांना जोर चढला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “उद्धव साहेबांनी युतीसाठी त्यांना प्रतिसाद दिला होता. महाराष्ट्र हितासाठी जे कोणी सोबत येतील, आम्ही त्यांच्यासोबत आहोत. सेटिंगचे राजकारण नाही, आम्ही स्वच्छ मनाने एकत्र यायचं ठरवतोय. कोण टाळी देतं, कोण साथ देत आहे, हे सुरू राहणार आहे. महाराष्ट्र हितासाठी कुणीही आले तरी एकत्र येऊ.”
आदित्य ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे मनसेसोबतच्या युतीच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ येत असताना राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र हितासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले होते. उद्धव ठाकरेंनी या आवाहनाला प्रतिसाद दिला होता. मात्र, या संभाव्य युतीवर पुढे ठोस अशी चर्चा झाली नाही. आता पुन्हा एकदा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या चर्चांना जोर चढला आहे.
आम्ही सेटिंगचे राजकारण करणार नाही
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, “साद-प्रतिसाद, टाळी, दुसरी टाळी हे सर्व चालूच असते. पण आम्ही महाराष्ट्राच्या हिताचे बोलत आहोत. आम्ही कुठेही सेटिंगचे राजकारण करणार नाही. आम्ही स्वच्छ मनाने पुढे येत आहोत. जे कोणी आमच्याबरोबर येतील त्यांना घेऊन पुढे जाऊ. हे कोणत्याही एका पक्षाबाबत बोलत नाही.”
महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, राज्याची अवस्था आज बिकट झाली आहे. निवडणुकीपूर्वी दिलेली वचने पूर्ण झालेली नाहीत. सरकारमधील तीनही पक्षांमध्ये वाद सुरू आहेत. हे वाद जनतेसाठी नसून कुणाला बंगला, कुणाला पालकमंत्री हवे आहे, यासाठी सुरू आहेत. महाराष्ट्र हिताची एकही गोष्ट तीनही पक्षांचे नेते बोलत नाहीत, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.
खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या ‘नरकातले स्वर्ग’ या पुस्तकावर प्रतिक्रिया विचारल्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, “पुस्तकाचे प्रकाशन होऊ द्या, मी पुस्तक वाचले नाही. संजय राऊत यांनी पक्षासाठी तुरुंगवास भोगला. जे तुरुंगात जाण्यास घाबरले, ते सगळे भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये गेले. भाजपने आमचा पक्ष फोडला, ती नीच प्रवृत्ती आहे.”