Thackeray Brothers Alliance News : अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या ठाकरे बंधूंच्या युतीला अखेर घोषणेचा अखेर मुहूर्त ठरला. आज दुपारी १२ वाजता मुंबईतील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेत ठाकरे बंधूंच्या युतीची जाहीर घोषणा होणार आहे. जुलै महिन्यातील मराठी विजय मेळावा आणि त्यानंतर वाढलेल्या भेटीगाठींमुळे ठाकरे बंधू एकत्र येणार ह्यावर जवळपास शिक्कामोर्तबच झाला. मात्र, ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा कधी होणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते.
अखेर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आणि जेष्ठ नेते संजय राऊत यांनी एक्सला पोस्ट करत युतीचा मुहूर्त जाहीर केला. दोन्ही बंधूंमध्ये जागावाटपाची चर्चा जरी झाली असली तरी त्यांच्या युतीची अधिकृत घोषणा कधी यावर अनेक चर्चा रंगल्या. (Shiv Sena MNS alliance for municipal elections)
मनसे आणि ठाकरेंची शिवसेना हे दोन्ही पक्ष मुंबईसह सहा महापालिकांमध्ये एकत्रित लढणार आहेत. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मीरा भाईंदर आणि पुणे या महापालिकांच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष एकजुटीने लढणार आहेत, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बुधवारी दुपारी १२ वाजता एकत्र येऊन युतीची जाहीर घोषणा करतील. तत्पूर्वी हे दोघे भाऊ दादरच्या शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर त्यांचे दर्शन घेण्यासाठी दाखल झाले आहेत. राज (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून आज युतीच्या घोषणेवळी जागावाटपाचा फॉर्म्युला आणि उमेदवारांची पहिली यादी देखील जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.









