Thane Coastal Road – ठाण्यातील बाळकुम ते गायमुख खाडीकिनारी प्रस्तावित ठाणे कोस्टल रोड (Thane Coastal Road) प्रकल्प मार्गातील अडथळे दूर झाले आहेत. सर्व आवश्यक परवानग्या प्राप्त झाल्याने लवकरच या प्रकल्पाच्या कामाला सुरूवात होणार आहे. घोडबंदर परिसरातील वाहतूककोंडीच्या पार्श्वभूमीवर हा मार्ग अत्यंत गरजेचा असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे.
बाळकुम ते गायमुख या १३.४५ किमी लांबीच्या आणि ४० ते ४५ मीटर रुंदीच्या मार्गासाठी वनविभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ, सीआरझेड, वायुदल आणि केंद्रीय पर्यावरण विभाग यांच्या परवानग्या आवश्यक होत्या. ठाणे महापालिकेला या सर्व मंजुरी नुकत्याच प्राप्त झाल्या आहेत. त्यासंदर्भातील माहिती १३ ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयासमोर सादर केली होती. न्यायालयाकडून अंतिम परवानगी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे.या प्रकल्पावर नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी आक्षेप घेतले होते. त्यामुळे न्यायालयाने सर्व परवानग्या मिळाल्याशिवाय काम सुरू न करण्याचे निर्देश दिले होते. पुढील सुनावणी ४ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
याशिवाय या कोस्टल रोडसाठी प्रकल्पासाठी अंदाजित खर्च १२०० कोटी रुपये होता. मात्र प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराने सादर केलेल्या सुधारित आराखड्यानुसार हा खर्च आता २७२७ कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. एमएमआरडीएकडून यासाठी अर्थसहाय्य दिले जाणार आहे.
हे देखील वाचा–
पुण्यातील फरार गुंडाच्या राजकीय संबंधांमुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा गोंधळ?
पंतप्रधान मोदींनी केली आयएनएस विक्रांतवर दिवाळी साजरी, पंतप्रधान मोदींनी केले सैन्याचे कौतुक..