Home / महाराष्ट्र / Thane Kalyan News : बेपत्ता नगरसेवकांचे पोस्टर लावणाऱ्या उबाठा उपविभाग प्रमुख रमेश तिखेंचा मृत्यू- उबाठा उपविभाग प्रमुख तिखेंच्या मृत्यूनंतर आरोप-प्रत्यारोप

Thane Kalyan News : बेपत्ता नगरसेवकांचे पोस्टर लावणाऱ्या उबाठा उपविभाग प्रमुख रमेश तिखेंचा मृत्यू- उबाठा उपविभाग प्रमुख तिखेंच्या मृत्यूनंतर आरोप-प्रत्यारोप

Thane Kalyan News : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील उबाठा गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक बेपत्ता असल्याचे पोस्टर लावणारे उबाठा उपविभाग प्रमुख रमेश तिखे यांचा...

By: Team Navakal
Thane Kalyan News
Social + WhatsApp CTA

Thane Kalyan News : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील उबाठा गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक बेपत्ता असल्याचे पोस्टर लावणारे उबाठा उपविभाग प्रमुख रमेश तिखे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. मात्र, पोलिसांकडून करण्यात आलेल्या कथित दबावामुळेच तिखे यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आणि खळबळजनक आरोप उबाठाने केला आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच हा प्रकार घडला आहे. उबाठा गटाचे नगरसेवक मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे, राहुल कोट आणि स्वप्निल केणे हे संपर्कात नसल्याचा दावा करत उबाठा पदाधिकाऱ्यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात नगरसेवक बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.

या पार्श्वभूमीवर उबाठा कार्यकर्त्यांनी शहरातील विविध भागांत चार नगरसेवक बेपत्ता असल्याचे पोस्टर लावले होते. या पोस्टर मोहिमेत उपविभाग प्रमुख रमेश तिखे यांचा सहभाग होता. दरम्यान, नगरसेवक मधुर म्हात्रे यांच्या वडिलांनी माझा मुलगा धार्मिक यात्रेवर गेला असून तो बेपत्ता नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, त्यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात मानहानीची तक्रार दाखल केली.

या तक्रारीनंतर पोलिसांनी रमेश तिखे यांच्यासह काही उबाठा कार्यकर्त्यांविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांकडून वारंवार पोलीस ठाण्यात बोलावून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

उबाठा जिल्हाप्रमुख शरद पाटील आणि युवासेना पदाधिकारी नीरज दुबे यांनी पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. “रमेश तिखे यांना सतत पोलीस ठाण्यात बोलावले जात होते. या मानसिक दबावामुळेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला,” असा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात तक्रारदार उमेश म्हात्रे आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान, यासंदर्भात कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण घेटे यांनी सांगितले की, “उमेश म्हात्रे यांच्या तक्रारीवरून मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास सुरू आहे. रमेश तिखे यांच्या मृत्यूबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. उबाठा गटाने दिलेल्या अर्जाच्या आधारे चौकशी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.”

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या