मुंबई- रेल्वेवरील (Railway) ताण कमी करण्यासाठी आणि प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी सरकार गंभीर आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Transport Minister Pratap Sarnaik) म्हणाले. आज विधानसभेत मुंब्रा रेल्वे अपघातावर (Mumbra train accident) चर्चा करण्यात आली. यावेळी भाजपा (BJP) आमदार अतुल भातखळकर (MLA Atul Bhatkhalkar) म्हणाले की, खासगी आस्थापनांच्या वेळांमध्ये बदल करण्याच्याबाबत राज्य सरकार, रेल्वे यांच्यातर्फे टास्क फोर्स (task Force) स्थापन केला गेला तर खासगी आस्थापनांशी चर्चा करता येईल. टास्क फोर्स स्थापन केला जाणार का?
यावर प्रताप सरनाईक यांनी उत्तर दिले की, रेल्वेच्या वेळांमध्ये लवचिकता आणण्याचा विचार सुरू आहे. कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले आहे की, तुम्ही ९ ऐवजी ९.३० किंवा १० वाजता कामावर आलात तरी कामाची वेळ पुढे वाढवून दिली जाईल. यामुळे एका विशिष्ट वेळेत होणारी गर्दी कमी करता येईल का, यावर सरकार विचार करत आहे. यासाठी टास्कफोर्स स्थापन करून खासगी आस्थापनांशी चर्चा केली जाईल.
मुंबई आणि उपनगरांमधून येणाऱ्या लोंढ्यांमुळे रेल्वेवरील भार वाढत असून यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे, याकडे सरनाईक यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले की, मेट्रो जाळे उभारण्यावर भर दिला जात आहे, परंतु अजूनही अपेक्षित परिणाम दिसत नाहीत. त्यामुळे लोक जीवाची पर्वा न करता रेल्वेच्या दरवाजांवर लटकून प्रवास करत आहेत. मुंब्र्यातील घटना हेच दर्शवते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत रेल्वे मंत्र्यांशी चर्चा केली आहे. साध्या लोकलला एसी ट्रेनप्रमाणे दरवाजे आपोआप बंद होणारी यंत्रणा देता येईल का, यावरही चर्चा सुरू आहे. त्यामुळे दरवाज्यावर लटकणाऱ्या प्रवाशांचा धोका कमी होईल. यासाठी फक्त रेल्वेवर अवलंबून राहून चालणार नाही, तर मेट्रो, पॉड टॅक्सी, जलवाहतूक, रोप वे असे विविध पर्याय राज्य सरकार विचाराधीन ठेवून काम करत आहे. रेल्वेवरचा भार कमी करणे आणि प्रवाशांचा जीव वाचवणे हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे