Prithviraj Chavan- राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी आज मोठा खळबळजनक दावा केला. त्यांनी असे भाकित केले आहे की, देशातील राजकारणात 19 डिसेंबरला मोठी घडामोड घडणार आहे. देशाचा पंतप्रधान बदलणार असून, मराठी माणूस पंतप्रधानपदी बसणार आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली तरी त्यांचा हा दावा अनेकांनी अविश्वसनीय ठरवून राजकीय उलथापालथीची शक्यता खोडून काढली. असे झाल्यास मोदींचे काय होणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर, मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, अशी पोस्ट केली होती. ही पोस्ट तूफान व्हायरल झाली होती. पृथ्वीराज चव्हाण यांनी एका कार्यक्रमात त्यांच्या पोस्टचा सविस्तर खुलासा केला. ते म्हणाले की, 19 डिसेंबर ही तारीख सध्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर चर्चेचा विषय ठरली आहे. अमेरिकेत एक विशेष कायदा करण्यात आला असून, तो कायदा तेथील संसदेने मंजूर केला आहे. स्वतः राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या कायद्याला मान्यता दिली होती. या कायद्यानुसार काही उद्योगपतींच्या कथित काळ्या व्यवहारांबाबतची सर्व माहिती सार्वजनिक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 19 नोव्हेंबरपासून एका महिन्याच्या आत, म्हणजेच 19 डिसेंबरपर्यंत, ही सर्व कागदपत्रे जाहीर केली जाणार आहेत. या दस्तऐवजांमध्ये अनेक नामवंत आणि प्रभावशाली व्यक्तींची
नावे आहेत.
चव्हाण पुढे म्हणाले की, आतापर्यंत काही नावे आधीच समोर आली असून, त्यामध्ये विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, इस्रायलचे पंतप्रधान, माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिटंन, ब्रिटनच्या राजपुत्राचे नाव तसेच मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांचा उल्लेख असल्याचे बोलले जात आहे. या माहितीची अधिकृतपणे पुष्टी झाली, तर त्याचा परिणाम भारतीय राजकारणावरही होऊ शकतो. काही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच इंग्लंड आणि अमेरिकेतील सूत्रांकडून मिळाली असली, तरी ठोस आणि अधिकृत माहिती 19 डिसेंबरलाच समोर येईल. या कायद्यात कोणतीही माहिती लपवण्यास मुभा नसल्याने सर्व सत्य बाहेर येईल. आतापर्यंत सुमारे 75 हजार छायाचित्रे, 20 हजार ई-मेल प्रकाशित झाल्याची माहिती आहे, तर अजून 20 जीबी डेटा 19 डिसेंबरला जाहीर होणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणातील माहितीची तपासणी करण्यासाठी वेळ लागणार आहे. या संपूर्ण प्रकरणावर आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू असून सुब्रह्मण्यम स्वामी यांनीही काही फोटो आणि व्हिडिओंबाबत संकेत दिले आहेत. जर या घडामोडींमुळे मोठा राजकीय भूकंप झाला, तर त्याचे पडसाद देशाच्या राजकारणात उमटू शकतात.
मराठी माणूस पंतप्रधान होणार या त्यांच्या वक्तव्यावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, हा राजकीय तर्क आहे, भविष्यवाणी नाही. सध्याच्या परिस्थितीत पर्यायी पंतप्रधान काँग्रेस किंवा इंडिया आघाडीकडून होण्याची शक्यता नाही, कारण आमच्याकडे बहुमत नाही. त्यामुळे पंतप्रधान भाजपाचाच होणार, हे स्पष्ट आहे. भाजपामध्ये जे काही संभाव्य पर्याय आहेत, त्यामध्ये मराठी चेहर्याची शक्यता अधिक वाटते, म्हणूनच मी ते विधान केले होते. कोणाचे नाव घेण्यात अर्थ नाही. कारण सर्वांनाच माहिती आहे की कोणते चेहरे
चर्चेत आहेत. अखेरीस हा निर्णय संघ घेणार आहे. मात्र 19 डिसेंबरला नेमके काय घडते, ते पाहणे महत्त्वाचे ठरेल.
सत्ताधारी भाजपा आणि महायुतीच्या नेत्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका केली आहे. मंत्री आशिष शेलार म्हणाले की, एवढ्या वरिष्ठ नेत्याने, माजी मुख्यमंत्र्याने असे बालिश विधान केले आहे, याचे आश्चर्य आहे. ज्यांचे स्वतःचे कराडमध्ये राजकीय भविष्य ठाम नाही आणि ज्यांना कराडमधील जनतेची काहीही जाण नाही, त्यांनी देशाच्या राजकारणावर आणि पंतप्रधानांवर मत व्यक्त केले, हे खरेच हास्यास्पद आहे. हा या वर्षातील सगळ्यात मोठा विनोद आहे. शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, काँग्रेसचे मोठे नेते एनडीएबद्दल भाकीत करत आहे, तिकडे त्यांचा पक्ष संपत चालला आहे. या मोठ्या नेत्यांना काय झाले हेच समजत नाही. असे काही बदल होणार अशी कोणतीही माहिती आमच्यापर्यंत आलेली नाही. तर काँग्रेसच्या खा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, काहीतरी त्यांच्याकडे माहिती असणार म्हणून त्यांनी असे वक्तव्य केले असणार.
——————————————————————————————————————————————————
हे देखील वाचा –









