Powai incident: -रमुंबईच्या पवईत आज दुपारी थरारनाट्य घडले. सरकारकडून दोन कोटी रुपये थकीत असल्याच्या संतापातून कंत्राटदार रोहित आर्य याने महावीर क्लासिक इमारतीतील आरए स्टुडिओमध्ये 17 मुलांसह 19 जणांना ओलीस धरले होते. चार तास चाललेल्या या थरारानंतर पवई पोलिसांनी झटपट हालचाल करीत बाथरूममधून प्रवेश करीत सर्वांना सुरक्षित सोडवले. यावेळी रोहित हा मुलांवर आणि पोलिसांवर गोळ्या झाडणार तोच पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर (Powai incident) केला. कल्याणच्या शाळेत बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे प्रमाणेच रोहितलाही ठार मारण्यात आले. मोदींनी याच रोहितचे जाहीर कौतुक केले होते. पण सरकारने त्याचे दोन कोटी थकवले आणि त्यामुळे हतबल होऊन मानसिक खचलेल्या रोहितने टोकाचे पाऊल उचलले आणि त्यात त्याचा अंत झाला.
या प्रकरणात शिंदे गटाचे माजी तत्कालीन शिक्षणमंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांचे नाव चर्चेत आले आहे. त्यांच्या खात्याने रोहितचे पैसे थकवले. रोहितने त्यासाठी उपोषण केले होते. केसरकर आज सहज म्हणाले की, त्याने सरकारी यंत्रणेनुसार प्रयत्न करायला हवे होते. परंतु सरकारी फाईल कशा हलतात आणि कोणासाठी वेग घेतात हे सर्वांना माहीत आहे. सरकारी अनास्थेमुळे रोहितसारख्या हुशार तरुणाचा हकनाक बळी गेला.
पवईत महावीर क्लासिक इमारतीतील आरए स्टुडिओमध्ये राज्यभरातील 15 वर्षांच्या आतील काही अल्पवयीन मुलांना वेबसीरिजच्या ऑडिशनसाठी बोलावलेले होते. मागील 5-6 दिवसांपासून ऑडिशन सुरू असल्याने मुलांचे पालकही या ठिकाणी हजर होते. रोज दुपारी मुले दुपारच्या जेवणासाठी बाहेर येत होती. मात्र आज दुपारी कोणीही बाहेर आले नाही. काही वेळाने लक्षात आले की मुलांना हॉलचा दरवाजा बंद करून बंदी बनवले होते. दुपारी दोन वाजताच्या सुमारास याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पवई पोलिसांचे सुरक्षा पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ओलीस ठेवलेल्या मुलांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. यावेळी रोहित मुलांवर हल्ला करण्याच्या प्रयत्नात होता. त्यावेळी पोलिसांनी रोहितवर गोळीबार केला. या चकमकीत त्याच्या छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. पोलिसांनी त्याला तात्काळ रुग्णवाहिकेतून सेव्हन हिल रुग्णालयात दाखल केले. एक तासानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी त्याचा एन्काऊंटर केल्याची माहिती आहे. यादरम्यान  पोलिसांनी ओलीस ठेवलेल्या मुलांना व त्यांच्या पालकांना बसने सुखरूप घरी रवाना केले.
पोलिसांनी माहिती दिली की,15 वर्षाच्या आतील काही अल्पवयीन मुलांना वेबसीरिजच्या ऑडिशनसाठी बोलावलेले होते. दुपारी 2 वाजताच्या सुमारास पवई पोलीस ठाण्यात फोन आला की याठिकाणी रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने मुलांना ओलीस ठेवले आहे . त्यानंतर पोलिसांची सुरक्षा पथके याठिकाणी दाखल झाली. त्यांनी आरोपीशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलीस पथकाने आतील कर्मचार्याच्या सहाय्याने बाथरूममधून प्रवेश केला आणि कारवाई केली. यामध्ये 17 मुले, एक ज्येष्ठ नागरिक आणि एक सामान्य नागरिक असे 19 जणांना सुखरूप वाचवले. घटनास्थळावर आढळलेले एअरगन आणि काही रासायनिक पदार्थ जप्त केले.
रोहितने मुलांना ओलीस धरल्यावर स्वतःचा एक व्हिडिओ प्रसारित केला. या व्हिडिओमध्ये त्याने म्हटले की,मी रोहित आर्य, आत्महत्या करण्याऐवजी मी एक योजना आखली आणि काही मुलांना याठिकाणी ओलीस ठेवले आहे. माझ्या जास्त मागण्या नाहीत. अगदी साध्या व नैतिक मागण्या आहेत आणि माझे काही प्रश्न आहेत, मला काही लोकांशी बोलायचे आहे आणि त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. त्यांच्या उत्तरावर प्रतिप्रश्न असल्यास ते विचारायचे आहे. परंतु मला उत्तर पाहिजे, मला बाकी काहीही नको. मी दहशतवादी नाही किंवा पैशांची मागणीही नाही. मला चर्चा करायची आहे. मला उत्तरे हवी आहेत. त्यासाठी मी या मुलांना ओलीस ठेवले आहे.
याप्रकरणी आमदार दीपक केसरकर म्हणाले की, रोहित आर्य हे स्वच्छता मॉनिटर नावाचा एक उपक्रम चालवत होते. ते शासनाच्या मोहिमेत सहभागी झाले होते. त्या संदर्भात त्यांनी काही मुलांकडून थेट फी वसूल केली असे विभागाचे म्हणणे होते. पण आर्य यांचे म्हणणे होते की, त्यांनी अशी कुठल्याही प्रकारची फी वसूल केलेली नाही. हा विषय त्यांनी विभागाशी बोलून सोडवायला पाहिजे होता. अशाप्रकारे मुलांना ओलीस ठेवणे चूक आहे.मी शिक्षणमंत्री होतो तेव्हा स्वतः त्यांना मदत केली होती. मी चेकने त्यांना स्वत: पैसे दिले होते. पण सरकारच्या पेमेंटसाठी सर्व फॉर्मेलिटी पूर्ण कराव्या लागतात. त्यामुळे त्यांचा जो क्लेम आहे की, 2 कोटी मला येणे आहे हा मला तरी योग्य वाटत नाही. त्यांनी विभागाशी खात्री करावी आणि त्या संदर्भातील कागदपत्रे सादर करावेत. रोहित मनोरुग्ण आहे असे बोलणे योग्य नाही. त्यांनी याआधी उपोषण केले होते. त्यामुळे ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते असे दिसत नाही. शासनाकडे सिद्ध करावे लागते की, मी हे काम केले . त्यांनी सिद्ध करावे आणि पैसे घ्यावे. शासनाच्या नियमांचे  पालन करावे लागते. शासनाचे पैसे बुडत नाहीत. त्यांनी शासनाकडे आपली बाजू मांडली पाहिजे. नियमाप्रमाणे पैसे मिळत असतात. नियमाप्रमाणे काही पैसे मिळाले असतील. मी वैयक्तिक सहानुभूती म्हणून स्वत: पैसे दिले होते. शासनासाठी काम करताना कागदपत्रे द्यावी लागतात आणि आपली बिले मिळवावी लागतात.
प्रकल्पातून परस्पर वगळले
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानातील पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पाचे 2 कोटी रुपये न दिल्याचा आरोप संस्थापक रोहित आर्य याने केला होता. रोहितचा आरोप होता की, हा प्रकल्प शाळांमधील स्वच्छतेसाठी अत्यंत यशस्वी ठरला होता. गुजरातमध्ये 2013 मध्ये ‘लेट्स चेंज’ मोहिमेद्वारे गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनीही त्याचे कौतुक केले होते. त्यानंतर त्याने महाराष्ट्रासह इतर राज्यांत काम सुरू केले. त्यानंतर तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सूचनेनुसार 2022 मध्ये हा प्रकल्प स्वखर्चाने राबवला. मात्र पैसे न मिळाल्याने अनेक वेळा उपोषण केले. तरीही निधी मिळाला नाही. शिक्षण विभागाने मुख्यमंत्री ‘माझी शाळा सुंदर शाळा’ प्रकल्पातून परस्पर वगळले. प्रकल्प कायम ठेवला. त्यामुळे जुलै 2024 मध्ये उपोषण केले. मात्र, मंत्री केसरकर यांच्या आश्वासनामुळे उपोषण मागे घेतले. त्यानंतरही कामाचे पैसे न मिळाल्याने पुन्हा ऑगस्ट 2024  मध्ये उपोषण केले. त्यावेळी अधिकार्यांच्या बैठका झाल्या. मात्र, कोणताही निर्णय झाला नाही. अखेर वैतागून केसरकर यांच्या सरकारी बंगल्याबाहेर 29 सप्टेंबरला उपोषण केले. तेव्हा केसरकर यांनी वैयक्तिक मदत म्हणून 7 लाख आणि 8 लाख असे दोन धनादेश दिले आणि उर्वरित रक्कम 4 ऑक्टोबर 2024 ला देण्याचे आश्वासन दिले. परंतु, उर्वरित रक्कम मिळाली नाही.
———————————————————————————————————-
 
								 
								 
								 
								 
								 
				 
															 
								








