ठाणे – गेल्या ७ वर्षांपासून ठाणे महापालिका दिवा (Diva) येथे बेकायदा डम्पिंग ग्राउंडमध्ये कचरा टाकत आहे. त्यामुळे खारफुटीसह जैवविविधतेची झालेली हानी,ओल्या कचऱ्याने (garbage )केलेले भूजल प्रदूषण, दुर्गंधीचा असह्य त्रास आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला निर्माण झालेला धोका याची गंभीर दखल घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठाणे पालिकेला (TMC) १० कोटी २० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या आदेशाविरुद्ध आम्ही दाद मागणार आहोत असे घनकचरा विभागाचे उपायुक्त मनीष जोशी यांनी म्हटले आहे.
गेल्या वर्षी ३ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय हरीत लवादाने दिलेल्या निर्णयात दिवा डम्पिंगमुळे (dumping ground)झालेली पर्यावरणाची हानी ही गंभीर बाब असल्याचे म्हटले होते.त्यानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाने २ जुलै रोजी ठाणे पालिकेला पत्र पाठवले. त्यात १ मे २०२४ ते ३० एप्रिल २०२५ या कालावधीतील पर्यावरणीय भरपाई म्हणून १० कोटी २० लाखांचा दंड ठोठावण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
हा परिसर पूर्वीसारखा करून डम्पिंग ग्राउंडवरील कचरा त्वरित हटवावा, परिसराचे वैज्ञानिकदृष्ट्या पुनर्वसन करावे, नागरिकांची आरोग्य चिकित्सा करावी आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी दिव्यातील नागरिकांनी केली आहे. घनकचरा विभागाचे उपायुक्त मनीष जोशी यांनी म्हटले आहे की,दंड ठोठावण्याच्या आदेशाविरोधात आम्ही दाद मागणार आहोत. दिवा आणि भांडर्ली येथील डम्पिंगची जागा पूर्ववत करून दिली जाईल.निविदा काढून ठेकेदार निवडण्यात आला आहे.