Trimbakeshwar Kumbh Mela : नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी साधू-संत परंपरेची शुद्धता जपण्याच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. देशातील १३ प्रमुख आखाड्यांनी एकत्र येत बनावट साधू, महंत आणि संतांना कुंभमेळ्यात प्रवेश नाकारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी प्रत्येक साधू-संन्याशाला अधिकृत ओळखपत्र बंधनकारक असणार आहे.
अलीकडच्या काळात भगवी वस्त्रे परिधान करून साधूपणाचा बनाव करणाऱ्यांची संख्या वाढल्याची तक्रार आहे. अशा प्रकारांमुळे भाविकांची फसवणूक होत असल्याने आणि संत परंपरेची प्रतिमा मलिन होत असल्याने १३ आखाड्यांच्या महासभेत हा निर्णय एकमताने घेण्यात आला.
निर्णयानुसार, आखाड्यांशी संलग्न सर्व साधू-संन्याशांना स्वतंत्र ओळखपत्र दिले जाईल. या ओळखपत्रावर साधूचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट आकाराचा फोटो, तसेच आखाड्यातील पद व जबाबदारीचा तपशील नमूद केला जाईल. विशेष म्हणजे, ओळखपत्रावर गोपनीय बारकोड असणार असून, त्याची माहिती संबंधित आखाड्याच्या वरिष्ठांकडेच उपलब्ध राहील.
ही ओळखपत्रे संबंधित आखाड्याचे महासचिव किंवा वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीनेच जारी केली जातील. त्यामुळे कुणीही बाहेरील व्यक्ती साधू असल्याचा दावा करून कुंभमेळ्यात सहभागी होऊ शकणार नाही. कुंभमेळ्याच्या काळात प्रशासन, आखाडे आणि सुरक्षा यंत्रणांना या ओळखपत्रांच्या आधारे साधूंची खातरजमा करणे सुलभ होणार आहे.
आखाड्यांच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, हा निर्णय कोणालाही वगळण्यासाठी नसून खऱ्या संन्याशांचे संरक्षण आणि संत परंपरेची विश्वासार्हता जपण्यासाठी आहे. या उपक्रमामुळे कुंभमेळ्यातील शिस्त, सुरक्षितता आणि पारदर्शकता वाढेल, तसेच भाविकांमध्ये विश्वास निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.











