Trupti Desai : सिन्नर तालुक्यातील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाला रोज नवीन वळण मिळत असल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाशी अनेक राजकीय नेत्यांचा संबंध असल्याची माहिती आहे. अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर आणि शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांचे नाव चर्चेत असतानाच सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी आज शिंदे गटाच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांच्यावर आरोप केले आणि गोर्हे यांची चौकशी करण्याची मागणी केली. नीलम गोर्हे यांनी आरोप फेटाळले असले तरी या आरोपांमुळे खळबळ माजली आहे.
तृप्ती देसाई आज म्हणाल्या की, नीलम गोर्हे या सहा ते सात वर्षांपासून खरातच्या भक्त आहेत. आमदारकी, मंत्रिपद मिळावे म्हणून त्यांनी तीनवेळा त्याच्या भेटी घेतल्या. कोरोनाआधी पाथर्डी फाटा येथील एक्स्प्रेस इन या पंचतारांकित हॉटेलमध्ये गोर्हे या मुक्कामी होत्या. तेव्हा खरात त्यांना भेटण्यासाठी हॉटेलमध्ये गेला होता. त्यानंतर गोर्हे या स्वत: त्याच्या कॉलेज कार्यालयात दोनवेळा गेल्या होत्या. आपण मंत्री आमदार होऊ का याचे भविष्य जाणून घेण्यासाठी त्या खरातला भेटल्या होत्या. त्यांच्या सोबत गेलेल्यांनी पुण्यात येऊन मला ही माहिती दिली. उभयतांमध्ये आर्थिक हितसंबंधही होते का? याचीही चौकशी झाली पाहिजे. महिलांवरील अन्यायाविरोधात गोर्हे या नेहमीच आवाज उठवतात, भूमिका घेतात. पीडित महिलेला त्या भेटतात, पोलिसात चौकशी करतात. परंतु, विकृत खरातला अटक झाल्यानंतर मात्र त्यांनी तसे काहीच केले नाही. खरातवर कारवाई करा, असे मुख्यमंत्र्यांना पत्रही दिले नाही. गोर्हे या दोन ओळींचे पत्र लिहू शकल्या नाहीत, सभागृहात बोलू शकल्या नाहीत. रूपाली चाकणकरांवर ज्या पद्धतीने कारवाई झाली त्याच पद्धतीने नीलम गोर्हे यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली.
तृप्ती देसाई यांच्या आरोपांवर नीलम गोर्हे यां त्याला उत्तर देताना म्हणाल्या की, मागील चार दशकांपासून मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहे. माझी संपूर्ण कारकीर्द स्वच्छ राहिली आहे मागील 5 दशकात कोणत्याही ढोंगी, गुरूचा अवतार म्हणवणार्या बुवांना भेटायचे नाही हा संस्कार जपला आहे. माझी अढळ श्रद्धा अक्कलकोट स्वामी समर्थ, साई बाबा, गोंदवलेकर महाराज आणि गंगापूर दत्त महाराजांवर आहे. मी प्रबोधनकारी हिंदुत्व मानते. राजकीय पदे किंवा मंत्रिपद मिळवण्यासाठी मला कधीही कोणत्या तांत्रिक गुरूची गरज भासली नाही. नाशिक येथील एक्स्प्रेस इन हॉटेलमध्ये 6-7 वर्षांपूर्वी खरात नावाच्या व्यक्तीला भेटले, हे खरे नाही. यासंबंधित सर्व बातम्या काल्पनिक आहेत. अधिवेशन काळात माझी झालेली प्रशंसा काही हितशत्रूंना सहन झाली नाही. पुणे पालिकेत ज्यांना यश मिळाले नाही अशा लोकांनी माझ्या विरुद्ध षड्यंत्र रचले आहे. केवळ माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी हा बनाव केला आहे.










