Home / महाराष्ट्र / Trupti Desai Visit Ashok Kharat Ishaneshwar Mandir : अशोक खरात ज्या ठिकाणी खोटा २० फुटांचा नाग दाखवायचा, तिथे तृप्ती देसाईंची पाहणी..

Trupti Desai Visit Ashok Kharat Ishaneshwar Mandir : अशोक खरात ज्या ठिकाणी खोटा २० फुटांचा नाग दाखवायचा, तिथे तृप्ती देसाईंची पाहणी..

Trupti Desai Visit Ashok Kharat Ishaneshwar Mandir : स्वतःला ज्योतिषी आणि आध्यात्मिक गुरु म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात याच्या काळ्या कृत्यांचा...

By: Team Navakal
Trupti Desai Visit Ashok Kharat Ishaneshwar Mandir
Social + WhatsApp CTA

Trupti Desai Visit Ashok Kharat Ishaneshwar Mandir : स्वतःला ज्योतिषी आणि आध्यात्मिक गुरु म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात याच्या काळ्या कृत्यांचा पाढा आता पुराव्यासह समोर येऊ लागला आहे. खरातने मिरगाव येथील आपल्या ईशानेश्वर मंदिरात कशा प्रकारे भक्तांच्या मनात भीती निर्माण करून त्यांना लुटले, याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी आज या मंदिराला भेट देऊन तेथील बनावट यंत्रणेची प्रत्यक्ष पाहणी केली. या प्रकरणाचे धागेदोरे आता थेट मंत्रालयातील बड्या नेत्यांपर्यंत पोहोचल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

बनावट नाग आणि रबरी कातड्याचा वापर करून ‘दैवी’ भास-
अशोक खरात हा आपल्या मिरगाव येथील मंदिरात एक प्रकारची ‘भयशाळा’ चालवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. भक्तांना घाबरवण्यासाठी आणि आपल्याकडे अफाट दैवी शक्ती असल्याचे भासवण्यासाठी तो २० फुटांचा रबरी नाग आणि वाघाचे बनावट कातडे वापरत असे. गुहेसारख्या अंधाऱ्या भागात अचानक हा बनावट नाग समोर आणला जात असे, ज्यामुळे अनेक भाविक घाबरून बेशुद्ध पडत असत. याच मानसिक धक्क्याचा फायदा घेऊन खरात त्यांच्याकडून महागडे विधी करून घेत असे. धक्कादायक बाब म्हणजे, राज्यातील अनेक मंत्री, सनदी अधिकारी आणि चित्रपट सृष्टीतील कलाकारही या बनावट तंत्राला बळी पडले होते.

तृप्ती देसाईंची आक्रमक भूमिका आणि पाहणी-
आज सकाळी तृप्ती देसाई यांनी ईशानेश्वर मंदिरात पोहोचून खरातच्या त्या गुप्त दालनांची पाहणी केली, जिथे हे बनावट प्रयोग केले जात असत. खरात हा लोकांना कसा मूर्ख बनवत होता, याबद्दल त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांकडून आणि प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेतली. “अंधश्रद्धेचा बाजार मांडून महिलांवर अत्याचार करणाऱ्या या नराधमाला कठोर शिक्षा झालीच पाहिजे,” अशी आक्रमक भूमिका देसाई यांनी यावेळी मांडली. मंदिराच्या पाहणीनंतर त्या खरातच्या फार्महाऊसवर जाऊन तेथील संशयास्पद हालचालींचाही आढावा घेणार आहेत.

राजकीय राजीनाम्यांची मागणी आणि सुनेत्रा पवारांची भेट-
खरात प्रकरणाचे पडसाद आता राजकीय पक्षातही उमटू लागले आहेत. या प्रकरणात नाव अडकलेल्या आणि खरातशी संबध असल्याचा संशय असलेल्या नेत्यांविरुद्ध देसाई यांनी पवित्रा घेतला आहे. रुपाली चाकणकर यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा आणि रुपाली पाटील-ठोंबरे यांनी प्रवक्ते पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे. या संदर्भात त्या लवकरच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडणार आहेत. एखाद्या पक्षाच्या जबाबदार पदावर असलेल्या महिलांनी अशा भोंदूगिरीला खतपाणी घालणे हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद केले.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या