Tuljapur Election Result 2025 : महाराष्ट्र नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत (Maharashtra Nagarpalika results ) कोण विजयाचा गुलाल उधळणार आणि कोण पिछाडीवर राहणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांसोबतच सामान्यांना देखील लागून राहिली आहे. त्यामुळे निकालाच्या पार्शवभूमीवर राजकीय पक्ष मोठ्या प्रमाणावर सक्रिय असल्याचे देखील दिसून येत आहे. या सगळ्याबरोबरच तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीच्या निकालाकडे देखील अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. अतिशय चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत अखेर भाजपाने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. भाजपचे उमेदवार विनोद उर्फ पिंटू गंगणे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा दारुण पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयामुळे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा आपल्या मतदारसंघात असलेला दबदबा देखील यानिमित्ताने दिसून आला आहे.
विरोधकांनी या निवडणुकीत ड्रग्ज प्रकरणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर लावून धरला होता. प्रचारादरम्यान या मुद्द्यावरून तिकडेच वातावरण चांगलेच तापले असल्याचे चित्र होते, मात्र यासगळ्याला न जुमानता भाजपचे उमेदवार विनोद उर्फ पिंटू गंगणे यांचा विजय झाला आहे. मतदारांनी विकासाच्या मुद्द्याला आणि भाजपच्या नेतृत्वाला पसंती दिल्याचे देखील या निकालावरून स्पष्ट होत आहे. तुळजापूर नगरपरिषदेच्या या निवडणुकीत भाजपकडून पिंटू गंगणे आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे अमर मगर यांच्यात थेट लढत होती.
मतमोजणी शेवटी पिंटू गंगणे यांनी अमर मगर यांचा जवळजवळ १७७० मतांनी पराभव केला. निवडणुकीच्या दोन दिवसांपूर्वीच दोन्ही गटांमध्ये मोठा वाद झाला होता, ज्यामुळे शहरात तणावाचे वातावरण होते. मात्र, या सर्व संघर्षावर मात करत गंगणे यांनी आपल्या विजयाचा झेंडा फडकावला आहे.
पिंटू गंगणे यांचे नाव तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामुळे चांगलेच चर्चेत होते. या प्रकरणात ते आरोपी असून सध्या जामिनावर ते बाहेर आले आहेत. ऑगस्ट महिन्यात जेव्हा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तुळजापूर दौऱ्यावर आले होते, तेव्हा त्यांनी गंगणे यांचा जाहीर सत्कार देखील केला होता.
तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यासाठी १८६५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल हा सत्कार सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी केलेला हा सत्कार राजकीय वर्तुळात मात्र वादाचा विषय ठरला होता. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या सत्कारामुळे ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना राजकीय वरदहस्त असल्याचा गंभीर आरोप देखील विरोधकांनी केला होता. या संपूर्ण प्रकरणाच सावट निवडणुकीवर असतानाही जनतेने दिलेला कौल हा अतिशय महत्वाचा मानला जात आहे.
हे देखील वाचा – Bhagur Election Result 2025 : भगूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दणदणीत विजय; शिवसेनेची तब्ब्ल २५ वर्षांची सत्ता काढली मोडीत









