बीड – बीड शहरातील एका खासगी कोचिंग क्लासमध्ये(Private coaching class) १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा धक्कादायक प्रकार दोन दिवसपूर्वी उघडकीस आला होता. या प्रकरणी दोन शिक्षकांविरोधात पॉक्सो कायद्यानुसार बीडच्या शिवाजीनगर पोलीस (Shivajinagar Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होते. आज या दोघांना ही अटक करण्यात आली.
अल्पवयीन मुलीगी बारावीच्या वर्गात शिकवणी घेत होती. क्लासमधील एका शिक्षकाने क्लास सुटल्यानंतर केबिनमध्ये बोलावून तिच्याशी अश्लील कृत्य केले. या प्रकाराची माहिती तिने क्लासचे संचालकांना दिली. पण संचालकांनी संबंधित शिक्षकावर कारवाई करण्याऐवजी तिचा विनयभंग केला.जुलै २०२४ ते मे २०२५ या काळात हा प्रकार सुरू होता. तिने हा सर्व प्रकार घरी सांगितला. त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. या प्रकरणातील एक शिक्षक राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप अजित पवार गटाचे नेते आणि संदीप क्षीरसागर यांचे भाऊ योगेश क्षीरसागर यांनी केला होता.
संदीप क्षीरसागर आणि मनोज जरांगे पाटील सोबत आरोपींचे फोटो समाज माध्यमांवर (Social media) व्हायरल झाले होते. त्यामुळे आरोपीला पळून जाण्यासाठी स्थानिक आमदाराने मदत केल्याचा आरोप करत काल पालक आणि विविध पक्ष-संघटनानी आंदोलन केले. यानंतर आरोपींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले.आरोपी पुण्याकडून मांजरसुंबा, चौसाळा परिसरात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पथकांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचत चौसाळा आणि मांजरसुंबा परिसरातून दोघांना अटक केली.