Ubatha and MNS : मुंबई महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदासाठी उबाठाने आपली तीन नावे जाहीर केली. त्यात स्वीकृत नगरसेवकपदाची मागणी करणार्या मनसेला उबाठाने एकही नगरसेवकपद दिले नाही. काल राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यावर उबाठाने तातडीने ही नावे जाहीर केली. मनसेने नगरसेवकपद मागितले होते का, याबाबत राज ठाकरे यांनी मौन पाळले आहे. पण मनसेचे संदीप देशपांडे यांनी आज ‘कोते मन’ अशा शब्दात उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. यावरून पालिका निवडणुकीनंतर उबाठा-मनसे युतीत आता हळूहळू कटुता वाढू लागली आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
28 फेब्रुवारीला स्वीकृत नगरसेवकांच्या नावांची घोषणा केली जाणार आहे. महापालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांच्या संख्याबळानुसार उबाठाला तीन स्वीकृत नगरसेवक पदे मिळणार आहेत. उबाठा-मनसेने युतीत निवडणूक लढवली. त्यामुळे उबाठाने त्यांच्या कोट्यातून एक स्वीकृत नगरसेवकपद मनसेला देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. मात्र, उबाठाने साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर आणि कैलास पाठक ही तीन नावे स्वीकृत नगरसेवक म्हणून निश्चित केली. त्यामुळे मनसेची मागणी उद्धव ठाकरे यांनी धुडकावल्याचे स्पष्ट झाले.
उबाठाच्या घोषणेनंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्या व्हॉटसअॅपवर उद्धव ठाकरे यांचे थेट नाव न घेता त्यांना डिवचणारे स्टेटस ठेवले. त्यांनी एका वाक्यात म्हटले की, कोत्या प्रवृत्तीकडून कधीही स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये. देशपांडेंच्या या स्टेटसवर प्रतिक्रिया देताना उबाठाच्या महापालिकेतील विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, काल आदित्य ठाकरे यांच्याबरोबर राज ठाकरे होते त्यावेळी काय चर्चा झाली किंवा या मुद्यावर एकमत झाले का हे देशपांडेंना माहिती आहे का? ते मलाही माहिती नाही. देशपांडेंच्या वक्तव्यावर मला बोलायचे नाही. त्यावर भाष्य करणे हे फार उतावीळपणा होईल.
शहरांच्या समस्येवर शिंदे भेट
राज ठाकरेंनी स्पष्ट केले
मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी 18 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी ‘नंदनवन’ बंगल्यावर भेट घेतली होती. मुंबई महापालिका निवडणुकीनंतर या दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट होती. यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. उबाठा पक्षाला या भेटीचे काय वाटले हा प्रश्न उपस्थित झाला होता. यावर आज मनसेच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना राज ठाकरे म्हणाले की, मी शिंदेंना शहरांच्या समस्यांबाबत चर्चा करायला भेटलो होतो. आता निवडणुका दूर आहेत, त्यामुळे प्रत्येक भेटीत राजकारण पाहू नका.
राज ठाकरे म्हणाले की, आपल्याकडे आता पूर्वीसारखे निकोप राजकारण राहिले नाही. आज कुणी कुणाला भेटल्यानंतर त्यात युती-आघाडीचे राजकारण शोधले जाते. आता तीन वर्षांनंतर निवडणुका आहेत. आज ते सत्तेत आहेत. आम्हाला त्यांना काही सल्ले द्यायचे असतील, चांगल्या गोष्टी करून घ्यायच्या असतील, तर त्यांना भेटू नये का? प्रत्येकवेळी त्यात काहीतरी शोधलेच पाहिजे, याची काहीच आवश्यकता नाही. उद्या मी मुख्यमंत्र्यांनाही भेटेन. आज मुंबई, पुणे, ठाणे आदी अनेक शहरांत अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांवर आम्हाला जे वाटते ते सांगणे गरजेचे नाही का? गाड्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पार्किंगऐवजी गाड्या रस्त्यावर उभ्या राहतात, त्यामुळे वाहतूक कोंडी वाढते. याला कुठेतरी शिस्त लागली पाहिजे. या संदर्भातील मुद्दे शिंदे यांच्या कानावर घातले असून या कागदपत्रांची फाईलही दिली आहे. शिंदेंनी ही बाब तत्काळ मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे सोपवली आहे. राज्याचा नागरिक, एका पक्षाचा अध्यक्ष व विरोधी पक्ष म्हणून काही गोष्टी सत्ताधार्यांना सांगणे गरजेचे होते. त्यासाठी मी त्यांना भेटलो. मी त्यांना पुन्हा भेटेन. त्यावर तुम्हाला राजकारणाच्या काय चर्चा करायच्या त्या करा. दरम्यान, आज मनसेची रंगशारदा येथे बैठक पार पडली. यात मनसेच्या स्थापनेला 20 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी विशेष कार्यक्रमांची आखणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
—————————————————————————————————————————–










