Home / महाराष्ट्र / राज आणि उद्धव ठाकरे येणार एकत्र? शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या टिझरने चर्चांना उधाण

राज आणि उद्धव ठाकरे येणार एकत्र? शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या टिझरने चर्चांना उधाण

Shiv Sena Dasara Melava: मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर दरवर्षीप्रमाणे यंदाही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा रंगणार...

By: Team Navakal
Shiv Sena Dasara Melava

Shiv Sena Dasara Melava: मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर दरवर्षीप्रमाणे यंदाही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा रंगणार आहे. मात्र या वर्षीच्या मेळाव्याचा टिझर जाहीर होताच राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

“महाराष्ट्रहितासाठी होणार, गर्जना ठाकरेंची!” या टिझरमधील वाक्यामुळे यंदाच्या मेळाव्यात राज ठाकरेही (Raj Thackeray) उपस्थित राहणार का, यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

टिझरने वाढवले तर्क-वितर्क

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जारी केलेल्या या टिझरमध्ये उद्धव ठाकरेंचा चेहरा किंवा भाषणाचा कोणताही भाग नाही, फक्त ‘गर्जना ठाकरेंची!’ हा शब्दप्रयोग ठळकपणे वापरला आहे. या एकाच वाक्यामुळे ही गर्जना एकट्या उद्धव ठाकरेंची आहे की, ठाकरे बंधूंच्या एकत्रित उपस्थितीचा हा सूचक इशारा आहे, यावर आता राजकीय विश्लेषक तर्कवितर्क करत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात राजकीय आणि वैयक्तिक पातळीवर वाढलेल्या जवळीकीमुळे या चर्चांना बळ मिळाले आहे. गेल्या दोन महिन्यांत दोन्ही भावांच्या चार भेटीगाठी झाल्या आहेत. मराठीच्या प्रश्नावरून सुरू झालेला संवाद उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस, गणपती आणि राज ठाकरेंच्या मातोश्रींची भेट या निमित्ताने अधिक दृढ झाला.

युतीची शक्यता आणि राजकीय पार्श्वभूमी

राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे हयात असताना शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती. सुरुवातीला त्यांना चांगले यश मिळाले, पण नंतर ते टिकवता आले नाही. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनी भाजपासोबतची युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी स्थापन केली. या काळात दोन्ही भावांनी एकमेकांवर जोरदार टीकाही केली होती. त्यामुळे ते पुन्हा एकत्र येतील अशी शक्यता कोणालाही वाटली नव्हती.

मात्र, एप्रिल 2025 मधील एका मुलाखतीत राज ठाकरेंनी दिलेल्या सकारात्मक संकेतानंतर उद्धव ठाकरेंनीही त्याला प्रतिसाद दिला. त्यानंतरच दोन्ही भावांमध्ये भेटीगाठी वाढल्या आणि आता आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव गट) आणि मनसे यांच्यात युती होणार असल्याचे संकेत दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी दिले आहेत.

काही दिवसांपूर्वी उद्धव गटाचे नेते सचिन आहिर यांनी “राज ठाकरेंना दसरा मेळाव्याचे निमंत्रण देण्याची शक्यता आहे,” असे म्हटले होते. त्यावर नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी “ते येतील, पण माध्यमांनी जरा थांबावे,” असे सूचक उत्तर दिले.

जर राज ठाकरे दसरा मेळाव्याच्या मंचावर आले, तर ती केवळ एक राजकीय उपस्थिती नसेल, तर शिवसेना-मनसेच्या नव्या समीकरणांचा औपचारिक इशारा मानला जाईल.आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा 

ईशान्य भारताकडे काँग्रेसचे दुर्लक्ष इटानगरमध्ये पंतप्रधानांची टीका

Web Title:
संबंधित बातम्या