Uddhav Thackeray : महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या निवडणुकीचे रणमैदान सध्या चांगलेच तापले आहे. येत्या १५ जानेवारीला या महापालिकांसाठी मतदान होणार असून १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे.
या निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली आहे. एका विशेष मुलाखतीत बोलताना त्यांनी फडणवीस हे ‘वरतून लादलेले मुख्यमंत्री’ असल्याचे वक्तव्य केले आहे.
“बिनविरोध निवड म्हणजे लोकशाहीचा खून”
मुलाखती दरम्यान उद्धव ठाकरे यांनी बिनविरोध निवडणुकांच्या प्रक्रियेवर ताशेरे ओढले. ते म्हणाले, “बिनविरोध निवडणूक होणे म्हणजे लोकशाहीचा खून आहे.” भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले की, मी जेव्हा निवडून आलो होतो, तेव्हा कोणालाही पळवून नेले नव्हते किंवा कोणत्याही अध्यक्षांनी कोणावर दमदाटी केली नव्हती.
“देवेंद्र फडणवीस यांची निवड तरी कुठे झाली आहे? ते वरतून लादलेले मुख्यमंत्री आहेत, त्यांची केवळ बोलणी झाली आणि निर्णय जाहीर झाला,” असेही ठाकरे यांनी नमूद केले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरही त्यांनी पदावरून हटवण्याची मागणी करत टीका केली.
‘भगवा’ शब्दावरून निवडणूक आयोगाला आव्हान
निवडणूक काळात ‘भगवा’ शब्दाच्या वापरावर होणाऱ्या विरोधावरून उद्धव ठाकरे आक्रमक झालेले पाहायला मिळाले. “ज्या आयुक्तांनी भगव्या शब्दावर बंदी घालण्याचे आदेश काढले असतील, त्यांना जनतेने जाब विचारला पाहिजे. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी लोकसभेच्या वेळी रामाच्या नावाने मते मागितली होती, मग आता भगव्या शब्दाला विरोध का? मी भगवा शब्द वापरणारच आणि शिवसेना-मनसे युतीचा भगवा फडकणारच, हिंमत असेल तर माझ्यावर कारवाई करून दाखवा,” असे थेट आव्हान त्यांनी दिले.
“फोडाफोडीच्या राजकारणाला जनता कंटाळली”
राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना ठाकरे म्हणाले की, सध्या अत्यंत ‘निर्लज्जपणाचे’ राजकारण सुरू आहे. दमदाटी आणि फोडाफोडी करून मतदारांचा विश्वास जिंकता येत नाही. मतदार जेव्हा मत देतात, तेव्हा ते त्यांच्या आयुष्यातील ५ वर्षे नेत्याच्या हातात सोपवत असतात. “जनता सध्या चांगल्या पर्यायाच्या शोधात आहे आणि आम्ही तो पर्याय देऊ शकलो आहोत. माझ्यासोबत राज ठाकरे आणि शरद पवार आहेत. मी लाचारांसारखा भाजपसोबत गेलो नाही, त्यामुळे जनता आम्हालाच निवडून देईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.









