Uddhav Thackeray MLC : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former Chief Minister Uddhav Thackeray) यांचा विधान परिषद (Legislative Council)सदस्यत्वाचा कार्यकाळ येत्या मे महिन्यात संपत आहे. त्यानंतर ते पुन्हा विधान परिषदेवर जाणार का ? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. मात्र सध्याच्या राजकीय गणितांनुसार हा मार्ग तितकासा सोपा नसल्याचे चित्र आहे. कारण महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) विद्यमान संख्याबळावर केवळ एकच उमेदवार विधान परिषदेवर निवडून येऊ शकतो.
विधान परिषदेतील नऊ आमदारांचा कार्यकाळ मे महिन्यात संपत असून, त्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही समावेश आहे. या नऊपैकी काही आमदार विधानसभा निवडणुकीत (Assembly elections) विजयी झाल्याने त्यांचा प्रश्न निकाली लागला असला, तरी उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेत जाणार का, हा मुद्दा सध्या राजकीय चर्चेचा (political discussion)केंद्रबिंदू ठरला आहे. त्याआधी राज्यसभेच्या सात जागांसाठीही निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचा मार्ग मोकळा करायचा असेल, तर मविआमधील घटक पक्षांशी तसेच बाहेरील काही आमदारांशी समन्वय साधणे आवश्यक ठरणार आहे. मविआतील अंतर्गत समन्वय, इतर आमदारांचा पाठिंबा आणि राजकीय गणिते यावरच उद्धव ठाकरे यांच्या पुनरागमनाचा मार्ग अवलंबून असणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
मविआकडे सध्या ४८ आमदारांचे (MLAs,) संख्याबळ आहे. तर महायुतीकडे तब्बल २३५ आमदार आहेत. इतर पक्षांचे ३ आमदार असून दोन जागा रिक्त आहेत. त्या जागांवर मेपूर्वी पोटनिवडणूक झाली, तर विधान परिषद निवडणुकीत एकूण २८८ आमदार मतदान करू शकतील. या पार्श्वभूमीवर मविआचा केवळ एकच उमेदवार निवडून येण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
मागील वेळी विधानसभा सदस्यांमधून ९ जण विधान परिषदेवर गेले होते. त्यामध्ये मविआचे ५ आणि भाजपाचे ४ सदस्य निवडून आले होते. मात्र सध्याचे संख्याबळ पाहता मविआसाठी परिस्थिती आव्हानात्मक ठरत आहे.
दरम्यान, खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut)यांनी पत्रकार परिषदेत “उद्धव ठाकरेंनी पुन्हा विधान परिषदेवर जावे ही आमची इच्छा आहे,” असे वक्तव्य केल्याने या चर्चेला अधिक उधाण आले आहे. मात्र उद्धव ठाकरे स्वतः पुन्हा विधान परिषदेवर जाण्यास इच्छुक आहेत का, याबाबत अद्याप स्पष्ट भूमिका समोर आलेली नाही.
आमदारकीसाठी इतर पक्षांचा पाठिंबा अत्यावश्यक – मंत्री संजय शिरसाट

विधान परिषदेतील नऊ आमदारांचा कार्यकाळ संपत असताना उद्धव ठाकरे पुन्हा परिषदेत जाणार का, याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यावर मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देत स्पष्ट केले की, उद्धव ठाकरे यांना पुन्हा विधान परिषदेत जायचे असल्यास इतर पक्षांचा पाठिंबा अत्यावश्यक आहे.
शिरसाट म्हणाले, “काँग्रेस (Congress)आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) त्यांना विधान परिषद निवडणुकीत साथ देतात का, हे पाहावे लागेल. त्या पाठिंब्याशिवाय त्यांचे आमदार होणे शक्य नाही.” उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी विधान परिषदेवर निवड होऊन मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती. मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीत त्यांच्या समोर कोणतीही थेट निवडणूक उपलब्ध नसल्याने सभागृहात जाण्यासाठी विधान परिषदेचा मार्ग हाच प्रमुख पर्याय असल्याचे त्यांनी नमूद केले.
महाविकास आघाडीच्या स्थितीवर बोलताना शिरसाट यांनी म्हटले की, “काँग्रेसने अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी आता अस्तित्वात राहिलेली नाही. काँग्रेसची शरद पवार गटासोबत जाण्याचीही इच्छा उरलेली नाही, तर उद्धव ठाकरे गटाला त्यांनी आधीच बाजूला केले आहे.”
तसेच, “मुंबईत संख्याबळ नसल्याने काँग्रेसने उमेदवार दिला नाही. उगाच मराठी माणूस म्हणून काही बोलू नये. मविआ आता राहिलेली नाही,” असेही ते म्हणाले. पुढे शरद पवार राज्यसभेवर जाणार नाहीत, ते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असल्याचे त्यांनी नमूद केले. बारामतीमध्ये पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता असल्याचाही त्यांनी उल्लेख केला.
उद्धव ठाकरे यांच्या कारकीर्दकडे एक नजर

उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री होते. शिवसेनेतील राजकीय बंडानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत विरोधी बाकांवर स्थान घेतले. मराठी माणूस, शेतकरी आणि कष्टकरी जनतेच्या प्रश्नांवर भूमिका घेणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख राहिली आहे.
त्यांना शिवसेनेचे संस्थापक स्व. बाळासाहेब ठाकरे, स्व. मीनाताई ठाकरे आणि प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा समृद्ध सामाजिक-राजकीय वारसा लाभला. उद्धव ठाकरे यांचा जन्म २७ जुलै १९६० रोजी मुंबई येथे झाला. त्यांनी मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून शिक्षण घेतले.
राजकारणासोबतच छायाचित्रण आणि लेखन ही त्यांची आवड जोपासलेली क्षेत्रे आहेत. त्यांच्या छायाचित्रांची पुस्तके प्रसिद्ध झाली असून विविध प्रदर्शनांतून त्यांच्या कलाकृती रसिकांसमोर आल्या. व्यावसायिक छायाचित्रकार आणि लेखक म्हणूनही त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
उद्धव ठाकर आमदार कधी झाले ?
उद्धव ठाकरे हे २८ नोव्हेंबर २०१९ रोजी मुख्यमंत्री झाल्यानंतर संविधानानुसार सहा महिन्यांच्या आत विधानमंडळाचे सदस्य होणे आवश्यक होते. त्यानुसार ते १२ मे २०२० रोजी राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आले.
विधान परिषद सदस्य म्हणून त्यांचा कार्यकाळ ६ वर्षांचा असतो. त्यामुळे त्यांचा सध्याचा कार्यकाळ १२ मे २०२६ रोजी संपत आहे.
कार्यकाळ कसा संपत आहे?
विधान परिषदेतील सदस्यांचा कार्यकाळ निश्चित मुदतीचा (६ वर्षे) असतो. राजीनामा, अपात्रता किंवा निधन यांशिवाय सदस्यत्व आपोआप संपत नाही. उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत अशी कोणतीही घटना घडलेली नसल्याने त्यांचा कार्यकाळ नियमित मुदतपूर्तीनुसार मे २०२६ मध्ये संपत आहे. पुन्हा विधान परिषदेवर यायचे असल्यास त्यांना निवडणूक प्रक्रियेतून जावे लागेल आणि त्यासाठी आवश्यक संख्याबळाची जुळवाजुळव करावी लागेल.
हे देखील वाचा –
चाकण बैलगाडा आंदोलन प्रकरणात दोन माजी खासदार, एक माजी मंत्री, सात आमदार निर्दोष
महाशिवरात्रीला भीमाशंकर बंद ; विकास आराखड्याचा परिणाम
एका साखर कारखाना कामगाराचा अद्भुत प्रवास! तब्बल 20 लाख पुस्तकांचे साठवले ‘धन’








