Uddhav Thackeray Borivali Rada : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे हे शहरातील विविध भागांत प्रत्यक्ष भेटी देत प्रचाराची धार वाढवत आहेत. याच अनुषंगाने काल रात्री त्यांनी बोरिवली (पूर्ण) परिसरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार कविता माने यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी उपस्थित कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांशी संवाद साधत परिसरातील प्रश्न, निवडणूक वातावरण आणि स्थानिक अपेक्षा जाणून घेतल्या.
याच वेळी शिंदे गटाच्या शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांची प्रचार रॅली त्या ठिकाणी दाखल झाली. दोन वेगवेगळ्या राजकीय गटांच्या कार्यकर्त्यांची एकाच ठिकाणी उपस्थिती झाल्याने वातावरण तापले. ही भेट आटोपून उद्धव ठाकरे तेथून निघत असतानाच परिसरात अचानक तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. उद्धव ठाकरे गाडीत बसून परिसरातून बाहेर पडत असताना, मनसे आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेविरोधात भाजप व शिंदे गटाच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली.
घोषणाबाजीमुळे काही काळ परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आणि तणाव वाढला. परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेत पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला. अतिरिक्त बंदोबस्त तैनात करून कार्यकर्त्यांना वेगळे करण्यात आले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही आणि काही वेळातच तणाव निवळला.
नेमकं प्रकरण काय?
मागाठणे विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ११ मध्ये काल राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्या शिवशक्ती आघाडीच्या उमेदवार कविता राजेंद्र माने यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयाला शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी परिसरातील नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत स्थानिक प्रश्नांवर चर्चा केली तसेच आगामी निवडणुकीत कविता माने यांना भरघोस पाठिंबा देण्याचे आवाहन केले. मतदान यंत्रावर असलेल्या इंजिन चिन्हासमोरील बटण दाबून बहुमताने विजयी करा आणि आपल्या हातांना बळ द्या, असे स्पष्ट आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
ही भेट आटोपून उद्धव ठाकरे कार्यालयातून बाहेर पडत असतानाच त्याच ठिकाणी शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपच्या उमेदवाराची प्रचार रॅली दाखल झाली. रॅलीतील भाजप कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंसमोरच जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यामुळे परिसरातील वातावरण क्षणात तणावपूर्ण झाले. या घोषणाबाजीला प्रत्युत्तर देत शिवसेना (उद्धव गट) आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनीही आक्रमक भूमिका घेत घोषणाबाजी केली. काही काळ दोन्ही बाजूंनी घोषणांचा गदारोळ सुरू राहिल्याने परिस्थिती चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती.
दरम्यान, उद्धव ठाकरे हे मनसेच्या उमेदवार कविता माने यांच्या कार्यालयात आले होते, तर कविता माने यांच्याविरोधात महायुतीकडून आदिती खुरसुंगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांची एकाच ठिकाणी झालेली उपस्थिती आणि परस्परविरोधी घोषणांमुळे तणाव वाढला. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आणि कार्यकर्त्यांना शांत करण्यात आले.
या घटनेमुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार किती तीव्र टप्प्यावर पोहोचला आहे, हे स्पष्ट झाले असून, राजकीय प्रतिस्पर्धकांमधील संघर्ष टाळण्यासाठी प्रशासनाला अधिक सतर्क राहावे लागणार असल्याचेही या प्रसंगातून अधोरेखित झाले आहे.









