अकोला – वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (WCL) या कंपनीमध्ये नोकरी लावून देण्याच्या नावाखाली सुशिक्षित बेरोजगार तरुणांची कोट्यवधींची फसवणूक (Fraud) केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.या प्रकरणात तरुणांकडून पैसे उकळणाऱ्या आरोपींनी शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार गोपीकिशन बजोरिया यांच्या नावाने धमक्या दिल्याचा आरोप काही तरुणांनी केला आहे.
बजोरिया यांनी हे आरोप फेटाळून लावले आहे.आपला आरोपींशी काहीही संबंध नाही,असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात दोन मुख्य आरोपी आणि त्यांच्या दोन कुटुंबियांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वासुदेव हालमारे आणि आशुतोष चंगोईवाला अशी मुख्य आरोपींची नावे आहेत. त्यांनी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची डब्ल्यूसीएल कंपनीच्या तोतया अधिकाऱ्यांची नागपूर येथे भेट घालून दिली. नोकरीसाठी प्रत्येक उमेदवारांकडून १० लाख रुपये त्यांनी उकळले. मात्र आठ महिने उलटून गेले तरी नोकरी लागली नाही.त्यामुळे उमेदवारांनी आरोपींकडे पैसे परत देण्यासाठी तगादा लावला. त्यावेळ आरोपी चंगोईवालाने गोपीकिशन बजोरिया यांचे नाव वापरून उमेदवारांना धमकावले.त्यानंतर उमेदवारांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.एकूण पंचवीस उमेदवारांची या प्रकरणात फसवणूक करण्यात आली आहे.