निलेश चव्हाणच्या घरावर छापा, आई-भावाची कसून चौकशी

पुणे – वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील सहावा आरोपी निलेश चव्हाण याच्या घरावर आज पोलिसांनी छापा टाकला. निलेश चव्हाण फरार आहे.पोलिसांनी त्याची आई आणि भावाची कसून चौकशी केली.

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणावरून राज्यात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली आहे. वैष्णवीचा नवरा, सासू, सासरा नणंद आणि दीर या पाचही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. फरार निलेशचा शोध सुरू आहे.

याच पार्श्वभूमीवर मध्यरात्री पुणे पोलिसांनी निलेशच्या घरावर छापा टाकला. या कारवाईत त्याच्या घरातून लॅपटॉप आणि इतर काही महत्त्वाच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. लॅपटॉपमध्ये काही संशयास्पद माहिती असल्याची पोलिसांनी सांगितले. निलेश चव्हाणचा आणि हगवणे कुटुंबाचा कोणताही थेट संबंध नव्हता, तरी त्याने वैष्णवी हगवणेचे बाळ काही काळ स्वतःकडे ठेवले होते. विशेष म्हणजे, कस्पटे कुटुंबीय बाळाचा ताबा घेण्यासाठी आले असताना निलेशने त्यांच्यावर बंदुकीचा धाक दाखवला होता. यावेळी त्याचे कुटुंबीयही त्याच्यासोबत उपस्थित होते. त्यामुळे त्याचा भाऊ आणि वडील यांची कर्वेनगर पोलीस चौकीत चौकशी करण्यात आली. या घटनेनंतर निलेश चव्हाणचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आला आहे.