पुणे – वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी पिंपरी चिंचवड व बावधन पोलिसांनी संयुक्तरीत्या कारवाई करत अनेक वाहने व वस्तू जप्त केल्या आहेत. फरार आरोपी राजेंद्र हगवणे यांनी पळून जाण्यासाठी वापरलेली एंडेवर, थार, बलेनो आणि फॉर्च्यूनर अशा चार गाड्या याचसोबत अॅक्टिव्हा स्कूटर पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.
१७ मे रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे फरार झाले होते. यावेळी सुशील हगवणे याने बलेनो गाडीचा वापर केला होता. ही गाडी आता बावधन पोलिसांनी जप्त केली आहे. याशिवाय, कस्पटे कुटुंबीयांनी वैष्णवीला दिलेल्या स्त्रीधनातील चांदीची पाच ताटे, पाच तांबे, चार वाट्या, एक करंडा आणि एक चांदीचे ताट देखील जप्त करण्यात आले आहे. याचसोबत आरोपी सुशील हगवणे व शशांक हगवणे यांच्याकडे असलेली परवाना धारक शस्त्रे जप्त केले आहेत.
या प्रकरणात निलेश चव्हाण यांच्या अडचणींमध्येही वाढ झाली आहे. कस्पटे कुटुंबीयांना बंदूक दाखवून धमकावल्याच्या प्रकरणात निलेश चव्हाण सध्या फरार आहे. पोलिसांनी त्याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे. निलेश चव्हाणविरोधात आधीच हुंडाबळी प्रकरणात गुन्हा दाखल आहे.
मात्र, आता वैष्णवीच्या नऊ महिन्यांच्या बाळाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याच्या कारणावरून बाल न्याय (मुलांचा संरक्षण) अधिनियम, २०१५ अंतर्गत कलमे वाढवली आहेत. बाळाला बंदिस्त व असुरक्षित स्थितीत ठेवण्यात आले होते, अशी माहिती तपासात पुढे आली आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचे बाळ निलेश चव्हाण याच्याकडे असल्याचे निष्पन्न झाले होते. त्या दरम्यान, बाळाची योग्य काळजी न घेतल्याचा आरोप कस्पटे कुटुंबीयांनी केला होता.
त्यानुसार, बावधन पोलिसांनी या प्रकरणातील कलमे वाढवून नव्याने तपास सुरू केला आहे. सध्या पुणे व पिंपरी-चिंचवड पोलिसांचे पथक निलेश चव्हाणचा शोध घेत आहेत. लवकरच त्याला ताब्यात घेऊन पुढील चौकशी करण्यात येईल, असा विश्वास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.