वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण: शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक खुलासे; कथित ऑडिओ क्लिप देखील व्हायरल

Vaishnavi Hagwane

Vaishnavi Hagwane | राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे (Rajendra Hagwane) यांची सून वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagwane) हिच्या मृत्यूने राज्यात खळबळ उडाली आहे. सुरुवातीला वैष्णवीने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले, पण आता शवविच्छेदन अहवालातून (autopsy report) धक्कादायक माहिती समोर येत आहे. वैष्णवीच्या शरीरावर जखमा होत्या, असे शवविच्छेदन अहवालात समोर आले आहे, तसेच, वैष्णवीची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.

शवविच्छेदन अहवालातील धक्कादायक खुलासे

वैष्णवी हगवणे यांनी १६ मे रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मात्र, शवविच्छेदन अहवालात तिच्या शरीरावर जखमा असल्याचे समोर आले आहे. या जखमांमुळे त्यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या करण्यात आली? असा प्रश्न निर्माण झाला आहे. वैष्णवीच्या वडिलांनी तिचा खून करण्यात आलाय, असा गंभीर आरोप केला आहे.

वैष्णवीचे वडील आनंद उर्फ अनिल साहेबराव कस्पटे यांनी सासरच्या मंडळींविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील राजेंद्र हगवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वैष्णवीच्या वडिलांनी हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केला आहे.

पोलिसांची कारवाई आणि तपास

पोलिसांनी या प्रकरणी वैष्णवी यांचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांना अटक केली आहे. तर, वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची चार पथके रवाना झाली आहेत. पोलिसांनी हगवणे कुटुंबियांची फॉर्च्युनर कार आणि दुचाकी जप्त केली आहे. तसेच, त्यांनी बँकेत सोने तारण ठेवून कर्ज घेतले आहे. पोलिसांनी बँकेला पत्रव्यवहार करून यापुढे व्यवहार करताना पोलिसांना माहिती देण्याची सूचना केली आहे.

ऑडिओ क्लिपमुळे वाढले गूढ

वैष्णवी हगवणेची मैत्रिणीसोबत फोनवरील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये वैष्णवी सासरच्यांकडून आपला अमानुष छळ सुरू असल्याचे सांगत आहे. “मला ताई म्हणाली मी तुझी सगळीकडे बदनामी करते. जे केलंय, जे केलं नाही ते सगळं सांगते. मला म्हणाली की तुझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते. शशांकसोबतही तू कधी लॉयल नव्हती, असं मला ताई म्हणाली. तू फालतू तू घाणेरडी आहे, असं म्हणत होती. पप्पा आणि मम्मी यांनाही ती काही काही म्हणत होती,” असे वैष्णवी या कथित क्लिपमध्ये म्हणत आहे.

“मला मारताना दाजी बघत होते. त्यानंतर त्यांनी पण माझ्यावर हात उचलला. विशेष म्हणजे दाजींनाही ते खरं वाटलं आहे. त्यामुळे मी त्या माणसाला घटस्फोट देणार आहे. मी पप्पांना हे सांगितलं आहे. आपण त्यावर विचार करू, असं मला पप्पांनी सांगितलं आहे,” असेही वैष्णवी सांगत आहे. “मला खूप आश्चर्य वाटत आहे. माझा नवराच माझा कधी झाला नाही. सासू-सासरे यांच तर तसंच वागणं असतं. मी सगळ्यांना विरोध करून लग्न केलं. इथंच माझी चूक झाली. मी त्या घरात जाऊन चूक केली. सगळं बोलण्याच्या, समजण्याच्या पलीकडे गेलं आहे. ही छोटी गोष्ट आहे,” असेही वैष्णवी या कथित ऑडिओ क्लिपमध्ये म्हणत आहे.

Share:

More Posts