Home / महाराष्ट्र / वैष्णवी हगवणेंच्या 9 महिन्याच्या बाळाची जबाबदारी आता कोणाकडे असणार? सरकारचा मोठा निर्णय

वैष्णवी हगवणेंच्या 9 महिन्याच्या बाळाची जबाबदारी आता कोणाकडे असणार? सरकारचा मोठा निर्णय

Vaishnavi Hagwane Suicide Case | हुंड्याच्या छळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या वैष्णवी हगवणे यांच्या 9 महिन्यांच्या मुलाच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला...

By: Team Navakal
Vaishnavi Hagwane Suicide Case

Vaishnavi Hagwane Suicide Case | हुंड्याच्या छळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या वैष्णवी हगवणे यांच्या 9 महिन्यांच्या मुलाच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला होता. आईच्या निधनानंतर पोरक्या झालेल्या या मुलाचा सांभाळ कोण करणार, याबद्दल अनेकजण चिंता व्यक्त करत होते. या पार्श्वभूमीवर, बाल कल्याण समितीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता या 9 महिन्यांच्या मुलाचा सांभाळ त्याची आजी, म्हणजेच वैष्णवी हगवणे यांची आई स्वाती आनंद कस्पटे करणार आहेत.

या संदर्भात, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (X) वर पोस्टद्वारे माहिती दिली आहे.

आदिती तटकरे यांनी ट्विट करत माहिती दिली की, “पुण्यातील स्व. वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या 9 महिन्यांच्या मुलाचा सांभाळ करण्यासाठी बाल कल्याण समितीने त्याच्या आजी व स्व. वैष्णवी हगवणे यांच्या आई स्वाती आनंद कस्पटे यांना योग्य व्यक्ती म्हणून नियुक्त केले आहे. याबाबत जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या सामाजिक तपासणी अहवालानुसार स्वाती कस्पटे याच योग्य व्यक्ती असून त्यांचे सामाजिक, भावनिक व कौटुंबिक वातावरण बालकाच्या हितासाठी अनुकूल आहे.”

त्या पुढे म्हणाल्या, “यापुढे स्व. वैष्णवी हगवणे यांच्या मुलाचा, कु. जनक हगवणे यांचा कायदेशीर ताबा स्वाती आनंद कस्पटे यांच्याकडे असेल. बाळाच्या शिक्षणाची, आरोग्याची व सर्वांगीण विकासाची संपूर्ण जबाबदारी स्वाती कस्पटे यांची असेल.”

दरम्यान, वैष्णवी हगवणे यांनी 16 मे रोजी हुंड्यासाठी सासरच्यांकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. या प्रकरणी वैष्णवीचा पती, दीर, सासू, सासरे आणि नणंद यांना अटक करण्यात आली आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या बाळाच्या संगोपनाचा प्रश्न ऐरणीवर होता. सुरुवातीला बाळ काही दिवस दुसऱ्या व्यक्तीकडे होते, त्यानंतर ते नाट्यमयरीत्या कस्पटे कुटुंबीयांकडे सोपवण्यात आले. आता बाल कल्याण समितीने अधिकृतपणे बाळाचा ताबा त्याच्या आजीकडे सोपवला आहे, ज्यामुळे त्याच्या भविष्याची चिंता मिटली आहे.

Web Title:
संबंधित बातम्या