Vaishnavi Hagwane Suicide Case | वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात (Vaishnavi Hagwane Suicide Case) पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोठी कारवाई करत फरार असलेले सासरे राजेंद्र हगवणे (Rajendra Hagwane) आणि दीर सुशील हगवणे यांना अटक केली आहे. गेल्या सात दिवसांपासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. अखेर आज पहाटे साडेचार ते साडेपाचच्या सुमारास स्वारगेट परिसरातून पोलिसांनी दोघांनाही बेड्या ठोकल्या.
गेल्या आठवड्यात राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे हे फरार झाले होते. यापूर्वी पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे यांना अटक केली असून, त्यांना 26 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत होती. अखेर त्यांना आज स्वारगेटमधून ताब्यात घेण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील फोनद्वारे कस्पटे कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांना धीर दिला होता आणि आरोपींना लवकर अटक करण्याचे आश्वासन दिले होते.
राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सतत आपले ठिकाण बदलत असल्याने त्यांना पकडणे पोलिसांसाठी आव्हानात्मक बनले होते. अखेर आज त्यांना स्वारगेटमधून अटक करण्यात पोलिसांना यश आले. स्वारगेटमधील ज्या हॉटेलमध्ये हे दोघे थांबले होते, तिथले सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागले आहेत.
दरम्यान वैष्णवी हगवणेने 16 मे रोजी मुळशी तालुक्यातील राहत्या घरी गळफास घेतला होता. या प्रकरणी वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या फिर्यादीत त्यांनी सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळाचाआरोप केला होता, ज्यामुळे वैष्णवीने टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा त्यांनी केला होता. या तक्रारीवरून पोलिसांनी यापूर्वीच पती, सासू आणि नणंद यांना अटक केली होती. वैष्णवीच्या कुटुंबीयांनी हा आत्महत्येचा नसून हत्येचा आरोप केला आहे. वैष्णवीच्या लग्नात तिच्या माहेरकडून 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी (Fortuner car) आणि चांदीची भांडी देण्यात आली होती. तरीही सासरच्या मंडळींनी दोन कोटी रुपयांच्या अतिरिक्त हुंड्याची मागणी करत तिचा छळ केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, या घटनेची दखल घेत राज्य महिला आयोगाने पहिल्याच दिवशी सुमोटो (suo moto) दाखल केला होता. आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी एक्सवर पोस्ट करत माहिती दिली की, कायदा, सुव्यवस्था व प्रशासन त्यांचे काम उत्तमरित्या करत आहे आणि आरोपींवर कठोर कारवाईसाठी आयोग पाठपुरावा करत आहे.