Vande Bharat Express : रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांच्या मार्गावर नवीन थांबे मंजूर केले आहेत. सोलापूर-मुंबई या वंदे भारत गाडीला आता दौंड स्थानकावर थांबा मिळणार आहे, तर पुणे-हुबळी मार्गावरील गाडी किर्लोस्करवाडी येथे थांबेल.
सध्या हे थांबे प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आले आहेत आणि प्रवाशांचा प्रतिसाद पाहून ते कायमस्वरूपी करण्याची योजना आहे.
दौंड येथील प्रवाशांना फायदा
दौंड येथे थांबा मिळावा यासाठी गेले दोन वर्षे दौंड, बारामती, इंदापूर तसेच फलटण, खटाव, करमाळा, माढा, माळशिरस या परिसरातील लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन या थांब्याची मागणी केली होती. अखेर, मध्य रेल्वेने ही मागणी मान्य करत 24 नोव्हेंबर पासून मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसला दौंड येथे दररोज थांबा देण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
दौंड हे पुणे-सोलापूर पट्ट्यात असलेले औद्योगिक आणि कृषी क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र मानले जाते. या निर्णयामुळे उद्योजक, व्यवस्थापक आणि अभियंते यांसारख्या विविध क्षेत्रातील लाखो प्रवाशांना आता थेट दौंड येथून मुंबईला त्वरित प्रवास करता येणे शक्य झाले आहे. यापूर्वी त्यांना प्रवास करण्यासाठी पुणे किंवा सोलापूरपर्यंत जावे लागत होते.
डेमू समस्येवर उपाय
पुणे ते सोलापूर मार्गावर धावणाऱ्या डेमू (डीझेल इलेक्ट्रिक मल्टीपल युनीट) गाड्यांना वारंवार होणारे तांत्रिक बिघाड आणि विलंबाचा सामना करावा लागतो. दौंड येथील थांब्यामुळे नोकरी, शिक्षण आणि व्यवसायासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना डेमूच्या समस्येपासून दिलासा मिळून एक जलद आणि विश्वसनीय पर्याय उपलब्ध झाला आहे.
दौंड आणि किर्लोस्करवाडी येथील थांब्यांच्या वेळा
मुंबई ते सोलापूर (क्रमांक 22225): दौंड येथे रात्री 8.13 वाजता आगमन, 8.15 वाजता प्रस्थान.
सोलापूर ते मुंबई (क्रमांक 22226): दौंड येथे सकाळी 8.08 वाजता आगमन, 8.10 वाजता प्रस्थान.
याचबरोबर, पुणे-हुबळी वंदे भारत एक्सप्रेसला (क्रमांक 20669 व 20670) किर्लोस्करवाडी येथे थांबा मिळाल्याने सातारा-सांगली पट्ट्यातील प्रवाशांची सोय झाली आहे.









