Varsha Gaikwad on BMC Elections : महाराष्ट्राच्या राजकारणात आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची मोठी घोषणा झाली असली, तरी यामुळे महाविकास आघाडीत मोठी फूट पडल्याचे चित्र दिसत आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी या युतीवर आपली तीव्र प्रतिक्रिया दिली असून मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे.
ठाकरे बंधूंनी युती करण्यापूर्वी काँग्रेसला विश्वासात घेतले नाही किंवा साधी चर्चाही केली नाही, असा गंभीर दावा गायकवाड यांनी केला आहे.
युती आणि विचारधारेवरून ठाकरेंवर टीका
एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत बोलताना वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होणार हे आम्हाला आधीच माहित होते. प्रत्येक पक्षाला निवडणूक लढवण्याचा अधिकार असून मी त्यांना शुभेच्छा देते. मात्र, काँग्रेससाठी विचारधारा सर्वात महत्त्वाची आहे. आम्ही समाजाला जोडण्याचे काम करतो, त्यामुळे समाज तोडणाऱ्यांसोबत आम्ही कधीही जाणार नाही, अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
ठाकरे गटाने युती करण्यापूर्वी आमच्याशी कोणताही संवाद साधला नाही, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. ही निवडणूक कार्यकर्त्यांची असून त्यांच्याशी चर्चा करूनच आम्ही पुढचे पाऊल उचलले आहे.
मुंबईत काँग्रेसची नवीन आघाडी आणि रणनीती
महाविकास आघाडीत शकलं उडालेली असताना काँग्रेसने आता नवीन मित्रपक्षांची जुळवाजुळव सुरू केली आहे. काँग्रेस आता प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी, गवई गट आणि महादेव जानकर यांच्या रासपसोबत जाण्याच्या तयारीत आहे. या पक्षांसोबतची आघाडी जवळपास निश्चित झाली असून 27 डिसेंबरपर्यंत याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाशीही आमची चर्चा सुरू आहे, मात्र त्यांनी 50 टक्के जागा मागितल्याचा दावा चुकीचा असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले.
भाजपवर धार्मिक ध्रुवीकरणाचा गंभीर आरोप
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून मुद्दाम धार्मिक वाद निर्माण केले जात असल्याचा आरोप गायकवाड यांनी केला. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी हिंदू-मुस्लिम मुद्दा उपस्थित करून जनतेचे लक्ष मूळ प्रश्नांवरून भरकटवल्याचे त्या म्हणाल्या. मुंबईचा महापौर खान होईल अशा चर्चा करण्यापेक्षा पालिकेतील भ्रष्टाचार आणि विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले. धार्मिक विवाद बंद करून विकासाचा मुद्दा समोर आणणे हीच काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुंबईच्या विकासाचा काँग्रेसचा जाहीरनामा
जर मुंबईत काँग्रेसची सत्ता आली, तर आमचा मुख्य फोकस शहरातील वाढते प्रदूषण, घनकचरा व्यवस्थापन, बेस्ट बसची दुरवस्था, वाहतूक कोंडी, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत प्रश्नांवर असेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईचे रस्ते अभिनेत्रीच्या गालासारखे होतील असे म्हटले होते, पण सध्याच्या रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. महापालिकेचा निधी पार्टी फंड म्हणून वापरला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. मुंबईत जो प्रत्यक्ष काम करेल, तोच जनतेचा विश्वास जिंकेल असे त्या म्हणाल्या.
हे देखील वाचा – Raj Thackeray : “भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा!”; युतीच्या घोषणेनंतर राज ठाकरेंची पहिली पोस्ट









