Viral Video : आजच्या डिजिटल युगात कोणत्याही कौटुंबिक सोहळ्याचे मोजमाप हे फोटोग्राफी आणि सोशल मीडियावरील ‘लाइक्स’वरून केले जाते. साखरपुडा असो वा विवाहापूर्वीचे ‘प्री-वेडिंग’ शूट, प्रत्येक क्षणाला कॅमेऱ्यात टिपण्याचे एक वेगळेच वेड समाजात निर्माण झाले आहे. हा ट्रेंड आता केवळ लग्नापुरता मर्यादित न राहता, डोहाळे जेवण, ‘मॅटर्निटी फोटोशूट’ आणि बाळ जन्माला आल्यानंतरच्या ‘न्यू बॉर्न बेबी फोटोशूट’पर्यंत येऊन पोहोचला आहे. अलीकडेच सोशल मीडियावर अशाच एका आगळ्यावेगळ्या फोटोशूटचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून, त्यावरून नेटिझन्समध्ये दोन स्पष्ट गट पडल्याचे पाहायला मिळत आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका अवघ्या तीन महिन्यांच्या चिमुकलीला साक्षात ‘देवी महालक्ष्मी’च्या रूपात सजवण्यात आले आहे. या फोटोशूटसाठी बाळाला नऊवारी साडी, कपाळावर चंद्रकोर, गळ्यात ठुशी, कोल्हापुरी साज आणि हातात कमळाची फुले अशा पारंपारिक वस्त्रांलकारांनी नटवण्यात आले होते. सेटची मांडणीही एखाद्या मंदिराप्रमाणे किंवा देव्हाऱ्याप्रमाणे करण्यात आली होती, ज्यामुळे ती बालिका हुबेहूब देवीचे स्वरूप वाटत होती. तांत्रिकदृष्ट्या हे फोटोशूट अतिशय उच्च दर्जाचे आणि कलात्मक असले तरी, त्यामागील संकल्पनेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर समाजमाध्यमांवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी या सर्जनशीलतेचे कौतुक केले आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला एका मोठ्या वर्गाने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
बाळाला महालक्ष्मीचे रूप ? अतिरेक थांबवा-
आपल्या लाडक्या लेकीला साक्षात करवीर निवासिनी श्री अंबाबाई अर्थात महालक्ष्मीचे रूप देऊन तिचे व्यावसायिक फोटोशूट करण्यात आले. जरी हे रूप पाहताना डोळ्यांचे पारणे फिटत असले, तरी काहींनी या प्रकाराला ‘सांस्कृतिक अध:पतन’ आणि ‘हौसेचा अतिरेक’ संबोधून तीव्र निषेध नोंदवला आहे. या निमित्ताने सध्याच्या काळात फोफावत चाललेल्या ‘फोटोशूट संस्कृती’वर आता सडकून टीका होत आहे.
गेल्या काही वर्षांत उत्सवांचे आणि कौटुंबिक आनंदाचे स्वरूप पूर्णतः बदलले आहे. पूर्वी विवाह सोहळ्यापुरती मर्यादित असणारी फोटोग्राफी आता प्रिवेडिंग शूट, पोस्ट-वेडिंग शूट आणि लग्नाच्या वाढदिवसाला पुन्हा लग्न लावून त्याचे चित्रीकरण करण्यापर्यंत जाऊन पोहोचली आहे. इतकेच नव्हे, तर बाळ सहा महिन्यांचे झाले की अर्धा केक कापून त्याचे ‘हाफ बर्थडे’ फोटोशूट करण्याचे नवे फॅडही समाजात रुजले आहे. कोल्हापूरच्या या घटनेत तर अवघ्या तीन महिन्यांच्या कोवळ्या जिवाला जड दागिने, मुकुट आणि साडी नेसवून तासनतास कॅमेऱ्यासमोर बसवण्यात आले. हा सर्व अट्टाहास केवळ सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी आहे की भक्तीपोटी, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
या घटनेवर टीका करताना अनेक पालकांनी आणि विचारवंतांनी स्पष्ट केले आहे की, अशा प्रकारचे सादरीकरण ही आपली संस्कृती नसून ती केवळ प्रदर्शनाची हौस आहे. देवाचे रूप देणे ही श्रद्धेची बाब असली, तरी एका लहान जिवाला अशा प्रकारे कृत्रिमरीत्या सजवणे हे त्याच्या नैसर्गिक वाढीसाठी आणि आरोग्यासाठी घातक ठरू शकते. एकदा का असे व्हिडिओ व्हायरल झाले की, त्याचे लोण संपूर्ण समाजात पसरते आणि मग चढाओढ सुरू होते. ही ‘रील्स’ बनवण्याची स्पर्धा आपल्या परंपरांचे बाजारीकरण करत असून, यामध्ये बाळाचे निरागस बालपण हरवत चालल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
समारंभातील आनंद हा अंतर्मनाचा विषय असावा, तो केवळ कॅमेऱ्याच्या लेन्सपुरता मर्यादित राहू नये, असे मत व्यक्त होत आहे. “विवाह सोहळ्यापर्यंतची हौस समजण्यासारखी आहे, पण आता धार्मिक प्रतीकांचा वापर करून लहान मुलांचे असे फोटोशूट करणे हा अतिरेकच आहे,” अशा प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर उमटत आहेत.











