Rohit Pawar : आम्ही विलीनीकरण झाल्यावर एनडीएसोबत जाणार किंवा अजित पवार एनडीएमधून बाहेर पडून रस्त्यावर लढतील अशा दोन शक्यता होत्या. त्या ज्यांना आवडत नव्हत्या त्यांनीच हा अपघात घडवला का अशी शंका व्यक्त करत आमदार रोहित पवार यांनी पायलटवर दबाव आणून अजित पवार यांचे विमान मुद्दाम आदळल्याचा आरोप केला. विमानाचा ब्लॅक बॉक्स जळतो का? विमानात पूर्ण इंधन मुद्दाम भरले, व्हीएसआरचा मालक रोहित सिंग याला विदेशात जायला कुणी मदत केली? या अपघातामागे जे डोके आहे त्याला डीजीसीए वाचवत आहे का? असे एकामागोमाग एक सवालही रोहित पवार यांनी सरकारला केले. तपास केवळ तांत्रिक नको तर घातपाताच्या अनुषंगाने देशातील विरोधी नेते, न्यायाधीश यांचा समावेश असलेल्या समितीच्या देखरेखीखाली व्हायला हवा अशी मागणी त्यांनी केली.
आज रोहित पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत अपघातातील विविध तांत्रिक बाबींवर प्रकाश टाकत आपले मुद्दे मांडले. अजित पवार यांच्या विमानात इंधनाने भरलेले कॅन विमानात टॉयलेटजवळ ठेवण्यात आले होते. तिथेच ब्लॅक बॉक्स होता. आपल्याला असे म्हणता येईल की, आधी विमानात ठेवलेले कॅन पेटले व नंतर पंख्यांमधील पेट्रोलने पेट घेतला. आता ब्लॅक बॉक्स जळला असे म्हणतात. ब्लॅक बॉक्स जळतो का? तज्ज्ञ सांगतात की, 1100 डिग्री सेल्सिअस तापमानात किमान 1 तास हा ब्लॅक बॉक्स टिकतो. अनेक जण म्हणतील की तिथे मोठा ब्लास्ट झाला. पण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की, तिथे बरेचशे कागद जळालेले नव्हते. त्याचे कारण म्हणजे, स्फोटाचा भपका काही सेकंदाचा असतो. नंतर तो विझून जातो, त्यामुळे कागदही जळला नाही. शिवाय तेथील कॉपरच्या वायरही जळलेल्या नव्हत्या तर ब्लॅक बॉक्स कसा जळला याकडे लक्ष वेधले.
शिवाय मुंबईहून बारामतीला येण्यासाठी एवढे इंधन विमानात ठेवण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत रोहित पवार यांनी दृश्यमानता कमी असताना विमान परत मुंबईकडे नेता आले असते असे सांगितले. ते म्हणाले की , विमान उडताना टाकीत मुद्दाम पूर्ण इंधन भरले होते म्हणजे पायलटचा वापर करून त्याच्यावर दबाव आणून अपघात घडवला. इंधन जास्त असल्या
ने स्फोट जास्त होणार होते त्याप्रमाणे जास्त झाले. त्यात इंधनाचे अधिक कॅन ठेवले होते म्हणून विमान मुद्दाम उतरवण्यात आले.
व्हीएसआरचा गोपी नावाचा एक अवलिया आहे, तो फार करामती आहे. आता या कंपनीचे कागदपत्रे तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे तपास यंत्रणांनी सीसीटीव्ही फुटेज आणि ईमेल यांची देखील चौकशी करावी. दिल्लीतील मुख्यालयातून या गोपीकडे फ्लाईट प्लॅन आला असावा आणि त्याने तो इथे प्रिंट केला असावा. हे कागदपत्रांमध्ये छेडछाड करण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृपा करून फक्त कागदाला कागद जोडू नका, त्याची सखोल चौकशी करा, आम्हाला डिजीटल प्रुफ पाहिजे अशी मागणी देखील रोहित पवार यांनी केली.
अजित पवार यांच्या विमान अपघाताला विम्याचा देखील एक अँगल असल्याचा आरोप करत रोहित पवार म्हणाले की, ज्यावेळी ते विमान घेतले ते 35 कोटींना घेतले होते. मात्र आता त्याच्या इंजिनची गुणवत्ता पाहिली तर ते जास्ती जास्त 10 ते 15 कोटी रुपयाला विकले गेले असते. मात्र त्या विमानाची आजची विम्याची किंमत ही 55 कोटी रुपये होती. लायबिलिटी इन्शुरन्स हा 210 कोटी रुपये होता.
वैमानिकाला त्यातील किती विमा मिळणार होता हे त्याला माहिती होते का? असा सवाल त्यांनी केला. जे याला जबाबदार असतात त्या अकाऊंटेबल मॅनेजर, सेफ्टी मॅनेजर यांची चौकशी झाली आहे का? जबाबदार मॅनेजर कोण आहे याबाबत काही माहीत नाही.
त्याचप्रमाणे वैमानिक सुमित कपूर हे लेगसी आणि लेअरजेट ही दोन्ही प्रकारची विमाने चालवत होते. विमानाच्या मालकाचा मुलगा रोहित सिंगही दोन्ही प्रकारची विमाने चालवत होता. हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. सुमित कपूर व मालक रोहित सिंग हे मद्यपान करायचे. त्याचे व्हिडिओ आहेत. यातील सुमित कपूर हा उंची दारू प्यायचा, मद्यपानामुळे त्यांना नोकरीवरून काढूनही टाकण्यात आले. त्यांचा खर्च मोठा होता, ते डिप्रेशनमध्ये होते. तरीही त्यांना कंपनीत घेण्यात आले होते.2023 मध्ये जो अपघात मुंबईत झाला त्याच्या वैमानिकानेही मद्यपान केले म्हणून त्याला आधी निलंबित करण्यात आले होते.
दुसरीकडे व्हेनेझुएलाचा व्हीसीआर कंपनीचा वैमानिक तो त्या देशाचा असल्याने इथे विमान चालवू शकत नाही. मात्र विमानातून तो प्रवासी म्हणून येतो आणि मग कॉकपिटमध्ये जाऊन विमान चालवतो हे गैरप्रकार सुरू आहेत. या विमानाची उड्डाण मर्यादा संपत आली होती. फक्त 85 तास उड्डाण बाकी होते. पाच हजार ऐवजी 8 हजार तास या विमानाचे उड्डाण झाले होते अशी माहिती यावेळी रोहित पवार यांनी दिली.
लेअरजेट विमान भारतात रजिस्टर होऊ शकत नाही. अति महत्त्वाच्या व्यक्ती हे विमान वापरतात. मात्र बेकायदेशीरपणे ते रजिस्टर करण्यात आले आहे. नियमानुसार दोन तास रेकॉर्ड झाले पाहिजे. मात्र या विमानातील रेकॉर्डरमध्ये फक्त 30 मिनिटे रेकॉर्ड होते याकडे त्यांनी लक्ष वेधले.व्हीएसआर कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंग याच्या राजस्थानातील विवाहाला टीडीपीचे प्रमुख नेते होते. आता टीडीपीचे उड्डाणमंत्री या अपघातात घातपात नाही असे म्हणतात. हैदराबादचा एक व्यावसायिक हा उद्योगात व्हीएसआरच्या जवळचा आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील सत्तेतील नेत्यांना दु:ख झाले, जे राजस्थानात रोहित सिंगच्या लग्नाला गेले होते ते ही कंपनी बंद का करत नाही? की हे फक्त राजकीय कारणापुरतेच दु:ख आहे? यातील रोहित सिंग आता अमेरिकेत आहेत, त्यांना तिथे जायला मदत कुणी केली, अशी त्यांनी विचारणा केली.
यावेळी रोहित पवार यांनी म्हटले की अजित पवार यांच्या अपघातापूर्वी समीत ठक्कर नावाचा भाजपाच्या ट्रोलरने ‘महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार’ असे पोस्ट केले होते आणि नंतर ते काढून टाकले. आताही भाजपाचे लोक मला ट्रोल का करतात, त्यामुळे लोक वेगळा संशय घेऊ लागले आहेत असे रोहित पवार म्हणाले.
दरम्यान, यावेळी विलीनीकरणाबाबत बोलताना रोहित पवार यांनी सांगितले की, अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्या घरी 13 बैठका केल्या. राष्ट्रवादीला तरुण प्रदेशाध्यक्ष हवा असे त्यांचे मत होते व अमोल कोल्हे यांच्याकडे ते ही जबाबदारी देणार होते. अमोल कोल्हे यांना घेऊन पक्ष मोठा करण्याचे त्यांचे स्वप्न होते. जि.प. निवडणुकीसाठी पक्षाच्या मार्गदर्शक कागदाचे वितरण एक दुसरा नेता करत होता. ही कागदपत्रे स्वत: अजित पवार यांनी तयार केली होती व उमेदवार निवडून आणण्यासाठी 200 पट ताकद लावायची असे ठरले होते. प्रत्यक्षात 50 पटच ताकद दादांच्या निधनानंतर लावली आणि 150 पट ताकद कमी लावल्याने उमेदवार पडले असा दावा त्यांनी केला.
श्वेता सिंह डीजीसीएमध्ये नकोत
यावेळी त्यांनी श्वेता सिंह या महिलेवर अनेक गंभीर आरोप करत ती महाराष्ट्रातील एका राजकीय कुटुंबाशी संबंधित असल्याचे सांगितले. ते म्हणाले की या प्रकरणात श्वेता सिंह या कोण आहेत? याचा थोडासा अभ्यास करावा. थोडक्यात तुम्हाला सांगतो की, या आपल्या महाराष्ट्राच्या सुनबाई होत्या, आता नाहीत. डीजीसीएमध्ये बसून त्यांच्या ओळखीचा वापर करुन फार मोठे रॅकेट चालवतात. (श्वेता सिंह या भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचा पुत्र राहुल महाजन यांच्या पहिल्या पत्नी होत्या) अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीच्या एजन्सीमध्ये ज्या अपूर्वा अगरवाल नावाच्या महिला आहेत, त्या पूर्वी जेट एअरवेजमध्ये काम करत होत्या. त्यांच्यासह इतर सदस्यांना लेअरजेट विमान नेमके कसे असते हेच माहिती नाही. त्यांना या समितीत श्वेता सिंह यांनी टाकले असे आमचे मत आहे. अजित पवारांच्या अपघाताची चौकशी सुरू असताना या श्वेता सिंह यांना डीजीसीएमध्ये ठेवू नका अशी आमची मागणी आहे. कारण यांचा संपर्क फार मोठ्या स्तरावर पोहोचलेला आहे.














