Doctor suicide- सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे मृत्यू( Doctor suicide )प्रकरणात भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर आरोप झाल्यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटणमधीलच एका कार्यक्रमात त्यांना पूर्ण समर्थन दिले. या प्रकरणी विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप करत, चिंता करू नका. आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी आहोत, अशी नाईक-निंबाळकरांची पाठराखण केली. भाजपा किंवा मित्रपक्षाच्या एखाद्या नेत्यावर आरोप झाले की, मुख्यमंत्री लगेच वॉशिंग मशीन फिरवून तो स्वच्छ असल्याचे प्रमाणपत्र बहाल करतात, असे यावेळी पुन्हा दिसून आले.
विशेष म्हणजे, डॉ. संपदा मुंडे हिने आत्महत्या केली, त्या फलटणच्या मधुदीप हॉटेलसमोरील मैदानावरच फडणवीस यांच्या हस्ते विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी भाषण करताना फडणवीस यांनी सुरुवातीलाच, आज ज्या प्रचंड आणि अतिविशाल कार्यक्रमाचे नियोजन ज्यांनी केले आहे, फलटणच्या विकासासाठी सातत्याने संघर्ष केला ते आमचे मित्र रणजितसिंह नाईक - निंबाळकरजी, असा उल्लेख केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावर भाष्य केले. ते म्हणाले की, आज मी इथे येऊ नये, यासाठी प्रयत्न झाले. दोन दिवसांपूर्वी आमची लहान बहीण डॉ. संपदा मुंडे यांचा अतिशय दुर्दैवी मृत्यू झाला. त्या भगिनीने आत्महत्या केली. आत्महत्येचे कारणही आपल्या हातावर लिहून ठेवले होते. पोलिसांनी तत्काळ आरोपींना अटक केली. या प्रकरणातील जवळपास सगळे सत्य बाहेर येत आहे. कुठल्याही परिस्थितीत आमच्या या भगिनीला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. अलीकडच्या काळात प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवले जात आहे. काहीही कारण नसताना रणजितसिंह निंबाळकर आणि सचिन पाटील यांचे नाव घेतले जात आहे. मला थोडी जरी शंका आली असती तरी मी कार्यक्रमाला आलो नसतो. चुकीचे राजकारण करत असतील, तर ते सहन करणार नाही आणि त्याला मी उत्तर देणार.
फडणवीस यांच्या आधी केलेल्या भाषणात रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले की, त्या डॉक्टर महिलेचा जीव गेला. त्या बिचारीने कशासाठी जीव दिला याचे कारण शोधणे गरजेचे आहे. काही लोक गलिच्छ राजकारण करू पाहत आहेत. आम्ही फलटणकर याला भीक घालत नाही. कितीही वाईट आरोप झाले तरी कुणाला घाबरणार नाही. निंबाळकर कधीही चुकणार नाही. सर्व लोकांना परिस्थिती माहिती आहे.
दरम्यान, डॉक्टर संपदा मुंडे मृत्यू प्रकरणातील दुसरा आरोपी निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने काल रात्री अकरा वाजता फलटण पोलिसांसमोर हजर झाला. या प्रकरणात नाव आल्यावर बदने आधी पंढरपूरला गेला होता. त्यानंतर तो सोलापूरला गेला. तिथून तो बीडला घरी जाऊन आल्याची माहिती आहे. सोलापुरच्या काही पोलिसांसोबत समाजमाध्यमांवर तो संपर्कात होता. त्याला अटक केल्यानंतर त्याची 1 तास चौकशी करण्यात आली. त्याला आज न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
या प्रकरणावर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी एक्सवर पोस्ट करत भाजपावर टीका केली. त्यांनी म्हटले की, ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे. इतरांच्या वेदना कमी करण्याची आकांक्षा बाळगणारी एक डॉक्टर मुलगी भ्रष्ट शक्ती आणि व्यवस्थेतील गुन्हेगारांच्या छळाची बळी ठरली. भाजपाशी संबंधित काही प्रभावशाली व्यक्तींनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. सत्तेचे संरक्षण असलेल्या गुन्हेगारी विचारसरणीचे हे सर्वात भयानक उदाहरण आहे. सत्ता गुन्हेगारांना संरक्षण देते. आपण कोणाकडून न्यायाची अपेक्षा करायची? या डॉक्टर तरुणीच्या मृत्यूने भाजपा सरकारचे अमानवी आणि निर्दयी रूपच उघडकीस आले आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी आज डॉ. संपदा मुंडेच्या कुटुंबासोबत फोनवर संवाद साधला आणि प्रकरण पूर्ण तपास होईपर्यंत कुटुंबासोबत असल्याचे सांगितले. कुटुंबियांनी सुळे यांना सांगितले की, स्थानिक पोलीस तपासात हस्तक्षेप करत आहेत. ही आत्महत्या नसून हत्या आहे. विशेष तपास पथक नेमण्यात यावे आणि तपास केला जावा, अशी मागणी आहे. सुळे यांनी ती मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कानावर घालण्याचे आश्वासन दिले. सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे आणि आष्टीचे भाजपा आमदार सुरेश धस यांनीही संपदा मुंडेच्या कुटुंबाची भेट घेतली. या भेटीनंतर प्रणिती शिंदे म्हणाल्या की, या आत्महत्या प्रकरणात मृत डॉक्टरवर वरिष्ठांचा मोठा दबाव होता. गृहमंत्र्यांनी महिलेला संरक्षण देण्यापेक्षा महिला खासदारावर खालच्या पातळीवर टीका करण्यातच वेळ वाया घालवला. महिलांना संरक्षण देण्याची वेळ येते, तेव्हा मुख्यमंत्री हात वर करतात. महाराष्ट्राची संस्कृती खालच्या पातळीवर गेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यायला हवा.
तर आमदार सुरेश धस म्हणाले की, मी उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. या प्रकरणात आयपीएस दर्जाच्या महिला अधिकार्याच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी करणार आहे. संपदाने तीन वेळा पत्र देऊनही कोणताही पाठपुरावा झाला नाही. कंत्राटी डॉक्टरला किती वेळा पोस्ट मॉर्टेम ड्युटी दिली जाते, त्याची नियमावलीदेखील
तपासण्यात यावी.
हे देखील वाचा –
३० दिवसांत ग्रॅच्युइटी द्या ; अन्यथा आंदोलन करणार ! निवृत्त बेस्ट कर्मचाऱ्यांचा इशारा









