मुंबई – राज्याच्या पावसाळी अधिवेशनात आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी मिठी घोटाळ्यावरून (Mithi River Scams) विधानसभेत जोरदार हल्लाबोल केला. मिठी कंत्राट देताना मराठी माणूस कुठे दिसला नाही का, असा थेट सवाल करीत शिंदेंनी विरोधकांवर घणाघात केला. यावेळी त्यांनी बॉलिवूड अभिनेता डिनो मोरियाचा (Dino Morea) उल्लेख करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले. डिनोने तोंड उघडले, तर कितीतरी लोकांचा मोरया होईल, असा टोला लगावला.
एकनाथ शिंदे म्हणाले की, सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे ऑडिट करायलाच पाहिजे. एकदा सिमेंट काँक्रीटचे रस्ते सुरु झाल्यानंतर २५ वर्षे त्यामध्ये कोणत्याही दुरुस्तीची गरज नाही. मग असे असताना दरवर्षी दुरुस्ती करून त्या दुरुस्तीच्या नावाखाली पैसे काढण्याचे काम कोण करत होते? आम्ही तर डीप क्लीन ड्राईव्हने रस्ते धुतले. पण तुमच्या लोकांनी तिजोऱ्या धुतल्या. आम्हालापण बोलता येते. मिठीतील गाळ काढण्याचे काम कोणत्या ठेकेदाराला दिले होते? मग त्यावेळी मराठी माणूस दिसला नाही का? त्या कामासाठी डिनो मोरिया दिसला. आता जर त्या डिनोने तोंड उघडले तर कितीतरी लोकांचा मोरया होईल. त्यामुळे आरोप करत असताना असे आरोप करा की, जो खुद शीशे के घर में रहते है वो दूसरो के घर पत्थर नही फेकते. आम्ही लोक प्रामाणिकपणे काम करत आहोत. सिमेंट काँक्रीटचे रस्ते कधी पाहायला मिळाले असते का? कोस्टल रोड वेगाने कोणी पूर्ण केला? पण तुम्ही एखाद्यावर भ्रष्ट्राचाराचा आरोप करता तेव्हा तुम्हालादेखील आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. टेंडर टेंडर करून मुंबईला विकणारे कोण? ही यादी काढा त्यानंतर मराठी माणसांच्या मुद्यांवर बोला.