Dog bite: राज्यात कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत आहे. त्यातून अनेकांचे बळी जाण्याच्या घटना घडत आहेत. रायगडच्या कर्जतमधील ९ वर्षीय मुलाचा आणि भिवंडी शहरातील १२ वर्षीय मुलाचा कुत्रा चावल्याने मृत्यू झाल्याने भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कुत्रा चावला तर नेमके काय करायचे याची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी ‘नवाकाळ’ च्या पत्रकार वेदिका मांगेला यांनी डाॅक्टर अमृत यांची खास मुलाखत घेतली.
अनेकदा कुत्रा चावण्याच्या घटनांकडे किरकोळ म्हणून दुर्लक्ष केले जाते, मात्र डाॅक्टरांच्या मते हा विषय अत्यंत गंभीर आहे. पाळीव असो वा भटका, कुत्र्याचा चावा किंवा नखाने ओरखडा ही प्रत्येक घटना रेबीजच्या दृष्टीने धोकादायकच असते. रेबीजवर ठोस उपचार उपलब्ध नसल्याने वेळेवर इंजेक्शन घेणे हाच जीव वाचवण्याचा मार्ग असल्याचे डॉ. अमृत अरुण स्वामी यांनी नवाकाळला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे. त्यांनी हेही सांगितले की केवळ कुत्रा नाही तर मांजर किंवा इतर प्राणी चावला- ओरखाडले तर वैद्यकीय सल्ला घ्यावा.
कुत्रा चावला तर सर्वात आधी काय करायचे?
डॉ. अमृत- सर्वात आधी ज्या ठिकाणी जखम झाली आहे, ती जखम साबण लावून नळाखाली १० ते १५ मिनिटे वाहत्या पाण्याने धुवावी. जखम नेहमी वाहत्या पाण्याखालीच धुवावी.
जखम खोल नसेल तर इंजेक्शन घेणे गरजेचे आहे का?
डॉ. अमृत- हो, इंजेक्शन घेणे गरजेचे आहे. सर्वप्रथम टिटॅनसचे इंजेक्शन घ्यावे लागते. त्यानंतर रेबीजची इंजेक्शन घ्यावी लागतात. जर चावा मोठा असेल किंवा जखम खोलवर असेल, तर व्हॅक्सिनसोबत इम्युनोग्लोब्युलिन इंजेक्शन देणे आवश्यक असते.
एकूण किती इंजेक्शन घ्यावी लागतात?
डॉ. अमृत- एकूण पाच डोस असतात. ही इंट्रामस्क्युलर (स्नायूमध्ये) इंजेक्शन असतात. पहिल्या दिवशी दिलेल्या इंजेक्शनला डे झिरो म्हणतात. त्यानंतर दुसरे इंजेक्शन डे थ्री ( म्हणजे तिसऱ्या दिवशी इंजेक्शन देतात) तिसरे डे सेवन ( म्हणजे सातव्या दिवशी), चौथे डे फोर्टीन ( चौदाव्या दिवशी) आणि पाचवे डे ट्वेंटी-एट म्हणजेच २८व्या दिवशी दिले जाते. साधारणपणे ही इंजेक्शन खांद्यावरील डेल्टॉइड स्नायूत दिली जातात. उजव्या किंवा डाव्या खांद्यावर इंट्रामस्क्युलर पद्धतीने ही पाच इंजेक्शन २८ दिवसात घेणे आवश्यक आहे.
कोर्स पूर्ण करूनही रेबीजचा त्रास होऊ शकतो का?
डॉ. अमृत- जर कोर्स पूर्ण केला असेल, योग्य वेळी व्हॅक्सिन आणि इम्युनोग्लोब्युलिन दिले असतील आणि ते चांगल्या दर्जाचे असतील, तर रेबीज होण्याची शक्यता अत्यंत कमी, जवळजवळ नगण्य असते. इंजेक्शन दिल्यानंतर त्यामध्ये असलेले अँटीजन शरीरात जातात आणि त्याविरुद्ध शरीरात अँटीबॉडीज तयार होतात. इंजेक्शनचा इफेक्ट झाला आहे की नाही हे पाहायचे असेल, तर ‘अँटीबॉडी टायटर टेस्ट’ केली जाते. ही एक रक्त तपासणी असून त्यातून अँटीबॉडीजची पातळी कळते.
काही वेळा ३ इंजेक्शन घेतल्यानंतर डॉक्टर आणखी इंजेक्शनची गरज नाही असा सल्ला देतात , तर ते योग्य आहे का?
डॉ. अमृत- नाही. कुठलाही प्राणी चावल्यास किमान पाच इंजेक्शन घेणे आवश्यक असते. प्राण्यांमध्ये फक्त कुत्राच नाही, तर मांजर किंवा जंगलातील कोणताही प्राणी चावल्यानंतरही रेबीजची इंजेक्शन घ्यावी लागतात. जंगलातील कोणत्याही प्राण्याने चावले, विशेषतः रात्री शेतात वगैरे एखाद्या अज्ञात प्राण्याने चावले असेल, तरीही रेबीजची इंजेक्शन घेणे गरजेचे असते.
कुत्र्यांमध्ये रेबीज कसा होतो?
डॉ. अमृत- रेबीज झालेल्या कुत्र्याने किंवा जंगलात राहणाऱ्या एखाद्या रेबीजग्रस्त प्राण्याने चावल्यानंतर दुसऱ्या कुत्र्याला रेबीज होतो. रेबीजचा व्हायरस हा फक्त प्राण्यांच्या शरीरातच जिवंत राहू शकतो. प्राण्याच्या शरीराच्या बाहेर तो जिवंत राहत नाही.
कुत्रा चावल्यावर लगेच इंजेक्शन घेतले पाहिजे का?
डॉ. अमृत- कुत्रा चावल्यानंतर रेबीजच्या व्हायरसचा परिणाम काही वेळा दोन-तीन दिवसांत दिसू शकतो, तर काही वेळा आठवडाभरात, दहा-पंधरा दिवसांत दिसू शकतो. काही प्रकरणांमध्ये तर दहा वर्षांनंतरही रेबीजची लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे कुत्रा चावल्यानंतर विलंब न करता त्वरित इंजेक्शन घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर कुत्रा चावला असेल, तर त्याच दिवशी सरकारी किंवा खासगी रुग्णालयात जाऊन रेबीजचे लसीकरण करून घ्यावे. त्या दिवशी शक्य नसेल, तर जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर इंजेक्शन घ्यावे.
जर मांजर किंवा कुत्र्याची नखे लागली तर?
डॉ. अमृत- नख मारले असेल तरी त्यावर उपचार करणे आवश्यक आहे. कारण रेबीजचा व्हायरस हा कुत्रा, मांजर अशा प्राण्यांच्या लाळेमध्ये असतो. हे प्राणी त्यांच्या समोरच्या पायांनी स्वतःला चाटून साफ करतात. त्यामुळे तो व्हायरस त्यांच्या नखांमध्येही असू शकतो. म्हणून फक्त चावल्यावरच नाही, तर नखाने ओरबडले तरीसुद्धा रेबीजची इंजेक्शन घेणे आवश्यक आहे.
पाळीव प्राणी चावला तरी त्रास होऊ शकतो का ?
डॉ. अमृत- कुत्रा किंवा मांजर पाळीव असले, त्याला रेबीजची लस दिलेली असली, पेट डॉगचे व्हॅक्सिनेशन झालेले असले, तरीसुद्धा जर त्याने चावले, तर ते अॅनिमल बाईट मानलंच पाहिजे. नखांनी ओरबडणे (नेल बाईट किंवा नेल अब्रेशन) हेही रेबीजच्या जोखमीमध्येच कन्सिडर केले पाहिजे आणि शंभर टक्के लसीकरण घेतलंच पाहिजे. हे सगळे सांगण्यामागचे कारण म्हणजे, कुत्रा पिसाळलेला आहे की नाही अशा गोष्टींमुळे गोंधळ निर्माण होऊ नये. मला सरळ एवढंच सांगायचे आहे की कुठलाही कुत्रा, मांजर किंवा इतर प्राणी चावला किंवा नखांनी ओरबडला, तर रेबीजची इंजेक्शन घ्यायलाच पाहिजेत. कारण रेबीजपासून बचावासाठी आपल्या हातात इंजेक्शन हाच एकमेव उपाय आहे. रेबीजचा इलाज नाही. एकदा रेबीजचा व्हायरस मेंदूपर्यंत पोहोचला, तर मृत्यू अटळ असतो .डेथ शंभर टक्के निश्चित असते.
इंजेक्शन घेतल्यानंतरही रेबीजची लक्षणे दिसू शकतात का?
डॉ. अमृत- हो कधी कधी असे प्रकार घडतात. कमी दर्जाचे इंजेक्शन असल्याने रेबीजचा प्रभाव राहण्याची संभावना असते. जर मागच्या वर्षी कुत्रा चावला असेल आणि त्या वेळी इंजेक्शन घेतले नसेल, तरीही आज इंजेक्शन घेता येऊ शकते. कारण रेबीजचा इन्क्युबेशन पिरियड (लक्षणे दिसण्याचा कालावधी) काही प्रकरणांमध्ये दहा वर्षांपर्यंत असू शकतो. त्यामुळे इंजेक्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे. कुत्रा चावून दोन-तीन वर्षे झाली असली, तरीही लसीकरण करून घेणे गरजेचे आहे.
सरकारी दवाखान्यात इंजेक्शन नसेल तर काय करायचे?
डॉ. अमृत- अशा वेळी खासगी दवाखान्यात जाऊन इंजेक्शन घ्यायला पाहिजे. जिथे उपलब्ध असेल तिथे त्वरित जाऊन इंजेक्शन घ्यावे. जर सरकारी रुग्णालयात इंजेक्शन उपलब्ध नसेल, तर आपल्या स्थानिक राजकीय प्रतिनिधींना किंवा लोकप्रतिनिधींना पत्र लिहावे की रेबीजसारखे अत्यंत आवश्यक इंजेक्शन सरकारी रुग्णालयात उपलब्ध नाही. यामध्ये डॉक्टरांची चूक नसते. अनेक वेळा लोक डॉक्टरांना दोष देतात, पण औषधांचा पुरवठा डॉक्टरांच्या हातात नसतो. कोणती औषधे उपलब्ध आहेत किंवा नाहीत, हे स्थानिक राजकारणी आणि लोकप्रतिनिधींनी पाहिले पाहिजे. सरकारी रुग्णालयांमध्ये सर्व आवश्यक आणि अत्यावश्यक औषधांचा पुरवठा योग्य पद्धतीने होतो की नाही याची जबाबदारी त्यांची असते.
मेडिकलमध्ये प्रिस्क्रिप्शनशिवाय ही इंजेक्शन मिळतात का?
डॉ. अमृत- नाही, प्रिस्क्रिप्शनशिवाय इंजेक्शन मिळत नाही. हे इंजेक्शन एमबीबीएस डॉक्टरांकडे जाऊन प्रिस्क्रिप्शन घेतल्यावरच मिळू शकते .
उपचार नीट झाले नाहीत तर रुग्ण कुत्र्यासारखा भुंकतो, हे खरे आहे का?
डॉ. अमृत- हो, ते खरे आहे. रेबीज झालेल्या रुग्णांमध्ये अशी लक्षणे दिसू शकतात. एकदा रेबीज झाला की रुग्ण कुत्र्यासारखा भुंकायला लागतो. त्यांना पाण्याची तीव्र भीती निर्माण होते, याला हायड्रोफोबिया म्हणतात. त्यानंतर प्रकाशाचीही भीती निर्माण होते, त्यामुळे अशा रुग्णांना अंधाऱ्या खोलीत ठेवावे लागते. याला फोटोफोबिया म्हणतात. ही लक्षणे दिसायला लागल्यानंतर काही दिवसांत रुग्ण इतर माणसांना चावण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे त्यांना रुग्णालयात बांधून ठेवावे लागते. कितीही उपचार दिले तरी एकदा रेबीजची लक्षणे दिसू लागली की काही दिवसांत रुग्णाचा मृत्यू होतो. रेबीज झाल्यानंतर मृत्यू शंभर टक्के निश्चित असतो.
रेबीजवर अजूनपर्यंत आपल्याकडे असा ठोस उपाय आलेला नाही का?
डॉ. अमृत- ठोस असा कोणताही उपाय अजूनपर्यंत उपलब्ध नाही. आतापर्यंत जगात फक्त दोन-तीनच केस अशा आहेत ज्यामध्ये रुग्णाला मुद्दाम कोमामध्ये (इंड्युस्ड कोमा) ठेवण्यात आले. म्हणजेच रुग्णाला कृत्रिमरित्या कोमामध्ये ठेवून विविध प्रयोगात्मक उपचार करण्यात आले आणि अशा फक्त दोन-तीन रुग्णांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र भारतात आजपर्यंत अशी एकही केस नाही की रेबीजचा उपचार करून रुग्ण पूर्णपणे बरा झाला आहे.
जो कुत्रा चावला तो जिवंत आहे का यावर लक्ष ठेवायला सांगतात, ते कशासाठी?
डॉ. अमृत- कारण ज्याला रेबीज झालेला असतो आणि ज्याच्यात रेबीजची लक्षणे दिसतात, असा कुत्रा साधारणपणे दहा दिवसांच्या आत मरतो. दहा-पंधरा दिवसांपेक्षा जास्त काळ तो जिवंत राहत नाही. म्हणूनच कुत्र्यावर १० दिवस लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
कुत्र्याला रेबीज झाला आहे का, हे आपल्याला कसे कळते?
डॉ. अमृत- कुत्र्याला रेबीज झाल्याची काही ठराविक लक्षणे दिसतात. कुत्रा खूप जास्त भुंकायला लागतो, पिसाटल्यासारखा वागतो. त्याला पाणी, प्रकाश आणि आवाजाची भीती वाटते. तो विनाकारण लोकांना चावतो. बर्याच वेळा असे होते की कुत्रा, मांजर किंवा इतर कोणताही प्राणी जर कोणी काठी दाखवली, ओरडले, शेपटीवर पाय पडला, किंवा त्रास दिला तर चावतो. तसेच मादी कुत्रीची लहान पिल्ले असतील आणि कोणी त्यांच्या जवळ गेले किंवा कुत्रा जेवत असताना त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला, तर तो चावू शकतो. हे त्यांचे नैसर्गिक वर्तन (नॉर्मल अॅनिमल इन्स्टिंक्ट) आहे. पण कुठलाही कुत्रा किंवा मांजर जर विनाकारण, कोणतीही चिथावणी न देता (विदाउट प्रोव्होकेशन) येऊन चावत असेल, तर त्यामध्ये रेबीजची शक्यता जास्त असते.
कुत्रा चावला तर काय खावे, काय खाऊ नये?
डॉ. अमृत- खाण्यापिण्यावर कोणतीही बंधने नाहीत. सर्व प्रकारचे अन्न, भाज्या, पालेभाज्या सगळे काही खाऊ शकतो.










