Ajit Pawar: महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य आधारस्तंभ अजित पवार यांच्या अचानक जाण्याने पक्षाचे अस्तित्व एका मोठ्या प्रश्नाखाली आले आहे. अजित पवार हे केवळ सत्तेचा केंद्रबिंदू नव्हते, तर पक्षातील प्रत्येक आमदाराला आणि कार्यकर्त्याला बांधून ठेवणारा तो मुख्य दुवा होते.
त्यांच्या निधनानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व कोण करणार आणि पक्ष एकसंघ राहणार का, यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
सुनेत्रा वहिनींकडे नेतृत्व जाणार की पेच निर्माण होणार?
अजित पवारांच्या पश्चात पक्षात ‘पवार’ नावाची भावनिक गरज ओळखून सुनेत्रा पवार यांचे नाव आघाडीवर आहे. सुनेत्रा वहिनी सध्या राज्यसभा खासदार आहेत आणि बारामतीत त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. कार्यकर्त्यांची आणि आमदारांची सहानुभूती मिळवण्यासाठी त्यांच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवली जाऊ शकते.
मात्र, अजित पवारांची आक्रमकता आणि त्यांची कामाची पद्धत सुनेत्रा वहिनींना पेलवेल का, हा मोठा प्रश्न आहे. दुसरीकडे, पार्थ आणि जय पवार हे दोन्ही सुपुत्र अद्याप राजकारणात हवे तसे स्थिरावलेले नाहीत. त्यांच्या अनुभवाची कमतरता पाहता, पक्षातील दिग्गज नेते त्यांचे नेतृत्व सहज स्वीकारतील अशी चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत.
दिग्गज नेत्यांची भूमिका आणि अंतर्गत रस्सीखेच
अजित पवारांच्या अनुपस्थितीत पक्षात अनेक ज्येष्ठ आणि मातब्बर नेते आहेत, ज्यांच्यात नेतृत्वाची स्पर्धा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- प्रफुल्ल पटेल: दिल्लीतील राजकारणाचा मोठा अनुभव असलेले प्रफुल्ल पटेल हे सध्या पक्षाचे मुख्य रणनीतीकार आहेत. मात्र, महाराष्ट्राच्या स्थानिक राजकारणात आणि आमदारांवर त्यांची पकड कितपत आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
- छगन भुजबळ: ओबीसी समाजाचे मोठे नेतृत्व आणि प्रदीर्घ अनुभव असलेले छगन भुजबळ हे सक्षम पर्याय ठरू शकतात. परंतु, या वयात त्यांच्याकडे संपूर्ण राज्याची जबाबदारी सोपवली जाईल का, हे निश्चित नाही.
- सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे: संघटनेत मजबूत पकड असलेले तटकरे आणि आक्रमक चेहरा असलेले धनंजय मुंडे हे देखील शर्यतीत असतील.
अडचण अशी आहे की, यापैकी कोणताही एक नेता सर्व आमदारांना एकमताने मान्य असेलच असे नाही. अजित पवारांचा शब्द जसा अंतिम होता, तसा अधिकार आता कोणाकडेही उरलेला नाही.
स्थिर समाधानाची उणीव आणि शरद पवारांचा प्रभाव
सध्याच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थिर उपाय शोधणे कठीण झाले आहे. जर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी सुनेत्रा वहिनींचे नेतृत्व मान्य केले नाही, तर पक्षात पुन्हा एकदा मोठी फूट पडण्याची भीती व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत, अजित पवारांच्या गटातील अनेक आमदार पुन्हा एकदा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येण्याची शक्यता अधिक प्रबळ झाली आहे.
याशिवाय, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास सुप्रिया सुळे देखील नेतृत्व करण्याची शक्यता नाकारता येत नागी. सत्तेसाठी किंवा राजकीय अस्तित्वासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण किंवा शरद पवारांच्या सावलीत परतणे, हाच एकमेव पर्याय कार्यकर्त्यांसमोर उरल्याचे चित्र दिसत आहे.











