MMRDA : लुंडच्या एलबीएस मार्गावर मेट्रो-4 साठी बांधण्यात येणारी भिंत कोसळली. त्यात एकाचा मृत्यू होऊन दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताबद्दल दोन कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे आदेश एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी यांनी दिले आहेत. पण एमएमआरडीएच्या ज्या अधिकार्यांवर मेट्रो-4 संबंधी बांधकामाचा तपास करण्याची जबाबदारी असलेल्या त्या साईट इंजिनिअर अधिकार्यांवर गुन्हा का दाखल झालेला नाही? त्यांना मुक्त सोडणार का? त्यांच्यावर कोणतीच कारवाई होणार नाही का? या प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजे.
भाजपाचे स्थानिक आमदार मिहिर कोटेचा यांनी म्हटले की, गेल्या महिन्यात मी या कामाची तपासणी करीत होतो, तेव्हा मला बांधकामात त्रुटी आढळल्या होत्या, मी एमएमआरडीएकडे तक्रार केली, काम सुरू असताना सुपरवायझरही उपस्थित नव्हता. जवळजवळ 55 ठिकाणी मला त्रुटी आढळल्या. याला कंत्राटदार आणि एमएमआरडीए जबाबदार आहेत. आणखी एकाने पोस्ट करीत एका खांबाला तडे गेल्याचा फोटो टाकला होता. मात्र यात कोणतीही त्रुटी नसून, हा मुद्दाम भीती पसरविण्याचा प्रयत्न असू शकतो, असे उत्तर एमएमआरडीएने दिले होते. अनेकांनी बांधकाम दर्जाबाबत आक्षेप घेतल्यानंतर अपघात घडल्याने जबाबदार अधिकारी कोण आहेत ते निश्चित करून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस आणि एमएमआरडीए यांनी मृताच्या कुटुंबाला भरपाई आणि जखमींना मदत जाहीर केली आहे. पण ज्यांची मुख्य जबाबदारी आहे त्या एमएमआरडीच्या साईट अधिकार्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे. एमएमआरडीएला आता जाग आली असून, संपूर्ण कामाचा तपास करण्यासाठी विशेष सुरक्षा तपासणी पथक स्थापन केले आहे. या पथकाने तपासाचे काम सुरू केले आहे. मात्र तूर्त फक्त एमएमआरडीएच्या कार्यकारी अभियंत्याला निलंबित केले आहे. या अपघाताची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. पण संबंधित अधिकारी अद्याप पदावर आहेत. काहीजण चौकशी समितीत आहेत. संशयित अधिकारी पदावर असताना या अपघाताचा निर्दोष तपास होण्याची सूतराम शक्यता नाही.










