Sharad pawar – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेतृत्त्व करणारे शरद पवार (Sharad pawar) पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांनंतर निवृत्त होतील, अशी चर्चा सुरू आहे. याचे कारण नुकत्याच संपलेल्या नगरपालिका आणि नगराध्यक्ष निवडणुकीत शरद पवार हे प्रचारात कुठेच दिसले नाहीत. आताच्या पालिका निवडणूक बैठकांमध्येही शरद पवारांची उपस्थिती नव्हती. उबाठा, मनसे आणि शरद पवार गटाची युती जाहीर झाली,
पण त्याआधी यासाठी ज्या बैठका झाल्या त्या चर्चेत शरद पवारांशी कुणीही भेट घेतली नाही. उद्धव, राज ठाकरे किंवा संजय राऊत त्यांच्या घरीचर्चेला गेले नाहीत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाच बैठकीला धाडण्यात येत होते. शरद पवार हे 85 वर्षांचे आहेत. याआधी त्यांनी निवृत्ती जाहीर करून माघार घेतली होती. पण आता शरीर साथ देत नसल्याने आपला पक्ष हा अजित पवार गटात विलीन करावा, सुप्रिया सुळेला केंद्रात मंत्रिपद मिळवून देऊन निवृत्त व्हावे, असा शरद पवार विचार करीत असल्याची चर्चा आहे.
पुण्यात आणि पिंपरी चिंचवड येथे अजित पवार गट आणि शरद पवार गट यांची युती झाली आहे. मात्र अजित पवार व शरद पवार यांची थेट भेट न होता त्याबाबत अजित पवार यांच्याशी चर्चा अमोल कोल्हे व अंकुश काकडे यांनी केली. दोन्ही गटाची युती झाली आहे याची घोषणाही केवळ अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. या महत्त्वाच्या पत्रकार परिषदेवेळीही शरद पवार उपस्थित नव्हते. शरद पवार रोज दौर्यावर जातात, जनतेचे म्हणणे समजावून घेतात आणि त्यानुसार सरकारला निवेदन देतात. पण नगरपालिका निवडणुकीपासून शरद पवारांचे दौरे बंदच झाले आहेत. अलिकडे ते फक्त बारामतीच्या कार्यक्रमात गौतम अदानी यांच्या सोबत दिसले. पालिकेचा सर्व प्रचार त्यांनी अजित पवारवर सोपवला आहे.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विलीन होणार का, या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवारांनी हसून तुझ्या तोंडात साखर पडो, असे गंमतीने म्हटले. ही गंमत सत्यात उतरणार अशी चर्चा आहे. काका-पुतण्या यांचे अखेर एकमत होऊन मिलन होईल का? याचे उत्तर पालिका निवडणुकीनंतर लगेचच मिळण्याची शक्यता आहे.
——————————————————————————————————————————————————
हे देखील वाचा –
किरकोळ वादाचा रक्तरंजित थरार; नांदेडमध्ये दोन गटांत तुफान राडा..









