Yashwant Killedar And Naresh Mhaske : मुंबईच्या राजकारणात आज एक महत्त्वाची हालचाल पाहायला मिळाली. एकेकाळी परस्परांचे कट्टर विरोधक असलेले मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार आणि शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांची अचानक भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. ही भेट कोकण भवनात झाली असून, बदलत्या राजकीय समीकरणांचा हा संकेत मानला जात आहे.
मनसेचे नगरसेवक आज कोकण भवनात गट नोंदणीच्या प्रक्रियेसाठी उपस्थित होते. याचवेळी शिंदे गटाचे ठाणे जिल्ह्यातील प्रभावी नेते आणि खासदार नरेश म्हस्के यांची यशवंत किल्लेदार यांच्याशी भेट झाली. सार्वजनिक ठिकाणी झालेली ही भेट केवळ औपचारिक की आगामी राजकीय घडामोडींचा भाग, यावरून तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
एकेकाळी शिवसेना–मनसे संघर्षात आक्रमक भूमिका घेणारे हे दोन्ही नेते आज एकत्र दिसल्याने ‘मनसे–शिंदे सेना जवळीक वाढतेय का?’ असा सवाल उपस्थित होत आहे. विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि स्थानिक पातळीवरील राजकीय गणितं बदलत असताना ही भेट अधिक महत्त्वाची मानली जात आहे.
या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, आगामी महापालिका राजकारणात नव्या युतीचे संकेत मिळत आहेत का? यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र या भेटीबाबत दोन्ही नेत्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे ही भेट राजकीय योगायोग की रणनीतीचा भाग, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.









