मुंबई – केंद्रीय महसूल अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede)यांची बहीण यास्मिन वानखेडे (Yasmeen Wankhede) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याविरोधात केलेल्या पाळत आणि बदनामीच्या आरोपांच्या चौकशीसंदर्भातील अहवाल अद्याप का सादर करण्यात आलेला नाही, याबाबत न्यायालयाने अंबोली पोलिसांना (Amboli police) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
या प्रकरणी यास्मिन यांनी २०२१ मध्ये अंधेरी न्यायालयात (Andheri magistrate court)तक्रार दाखल केली होती. ही तक्रार पुढे वांद्रे येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयात (Bandra magistrate court)वर्ग करण्यात आली. जानेवारी २०२४ मध्ये न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २०२ अंतर्गत अंबोली पोलिसांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, अद्याप पोलिसांनी अहवाल सादर न केल्याने वांद्रे येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी आशीष आवारी यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत पोलिसांना नोटीस बजावली.
यास्मिन वानखेडे यांच्या तक्रारीनुसार, नवाब मलिक यांनी एक्स आणि विविध वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतींमधून यास्मिन यांच्याविषयी खोटे व बदनामीकारक आरोप केल्याचा दावा करण्यात आला आहे. मलिक यांनी एका अमली पदार्थ विक्रेत्यासोबत यास्मिन यांचा फोटो असल्याचा आरोप केला होता. मात्र, यास्मिन यांनी हे आरोप फेटाळून संबंधित व्यक्ती अमली पदार्थ विक्रेता नसल्याचे आणि फोटोमध्ये छेडछाड केल्याचे म्हटले. याप्रकरणी यास्मिन यांनी आपल्या तक्रारीसह काही व्हिडिओ आणि छायाचित्रेही पुरावा म्हणून सादर केली आहेत. त्याचसोबत यापूर्वीही त्यांनी पोलिसांत तक्रार केली होती, मात्र योग्य ती कारवाई न झाल्यामुळे न्यायालयात धाव घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.