ZP Election Dates : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आल्याने राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत असलेल्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. यानुसार, पूर्वी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणारे मतदान आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात येणार असून, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणारी मतमोजणी आता ९ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडणार आहे.
दरम्यान, ७ आणि ८ फेब्रुवारी २०२६ रोजी शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) अगोदरच नियोजित आहे. अशा परिस्थितीत ७ फेब्रुवारी रोजी निवडणूक घेतल्यास, निवडणूक ड्युटीवर असलेल्या राज्यातील हजारो शिक्षकांना या परीक्षेला मुकावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा विहित कालावधीत उत्तीर्ण होणे शिक्षकांसाठी बंधनकारक असल्याने ही बाब गंभीर असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
बदललेल्या निवडणूक तारखांमुळे शिक्षकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी राज्यभरातील हजारो शिक्षकांची निवडणूक ड्युटी लावण्यात आली आहे. मात्र, परीक्षा आणि निवडणूक एकाच दिवशी आल्याने शिक्षकांसमोर पेच निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे निवेदन सादर करत सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची मागणी केली आहे. शिक्षकांची परीक्षा हुकणार नाही, यासाठी तातडीने योग्य नियोजन करण्यात यावे, अशी ठाम मागणी संघटनांकडून करण्यात आली आहे.
दरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या मुद्द्यावर राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, “निवडणूक आणि परीक्षा एकाच दिवशी कशा काय जाहीर केल्या जातात? राज्य सरकार आणि निवडणूक आयोगामध्ये कोणताही ताळमेळ दिसत नाही. अशा प्रकारे शिक्षकांचा छळ करणे योग्य नाही. आम्ही शिक्षकांच्या पूर्णपणे पाठीशी आहोत. ज्ञान देणाऱ्या शिक्षकांना वेठीस धरणे चुकीचे आहे.”











