Home / महाराष्ट्र / ZP Election Result 2026 : राज्यात जिल्हापरिषदेत चक्रावणारा निकाल; मतमोजणीला प्रारंभ; सुरुवातीच्या काळात महायुतीचे वर्चस्व

ZP Election Result 2026 : राज्यात जिल्हापरिषदेत चक्रावणारा निकाल; मतमोजणीला प्रारंभ; सुरुवातीच्या काळात महायुतीचे वर्चस्व

ZP Election Result 2026 : महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची मतमोजणी आज...

By: Team Navakal
ZP Election Result 2026
Social + WhatsApp CTA

ZP Election Result 2026 : महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची मतमोजणी आज अत्यंत चुरशीच्या वातावरणात सुरू झाली आहे. शनिवारी पार पडलेल्या मतदानानंतर आज सकाळी १०:३० वाजेपर्यंत हाती आलेल्या कलानुसार, राज्यामध्ये ‘महायुती’ने स्पष्ट आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकण पट्ट्यासह पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव व लातूर या जिल्ह्यांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. ७३१ जिल्हा परिषद जागा आणि १,४६२ पंचायत समिती जागांसाठी रिंगणात असलेल्या एकूण ७,४३८ उमेदवारांचे भवितव्य आज स्पष्ट होणार आहे.

सकाळी १०:३० पर्यंतचे पक्षनिहाय बलाबल (एकूण १०० जागांचे कल): सुरुवातीच्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या १०० जागांचे कल हाती आले असून, यामध्ये भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागांवर आघाडी घेत आपले वर्चस्व राखले आहे.

पक्ष आघाडीवरील जागा
भारतीय जनता पक्ष (भाजप) ३८
शिवसेना (एकनाथ शिंदे गट) २२
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) १९
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ११
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) ०६
इतर व अपक्ष ०५
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)००

सध्याच्या आकडेवारीनुसार, महायुतीने (भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट) एकूण ७९ जागांवर आघाडी घेत विरोधकांना मागे टाकले आहे, तर महाविकास आघाडीच्या गोटात अद्याप शांतता दिसत आहे.

कोकणात महायुतीची ‘बिनविरोध’ विजयाची सलामी निवडणूक निकालाचे अधिकृत आकडे हाती येण्यापूर्वीच कोकण विभागात महायुतीने विजयाचा पाया रचला आहे. सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतून महायुतीचे तब्बल २७ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या ५० जागांपैकी ८ जागांवर महायुतीने आधीच विजय मिळवला असून, यात भाजपचे ७ तर शिंदे गटाच्या एका सदस्याचा समावेश आहे. तसेच, येथील १०० पंचायत समिती जागांपैकी १७ जागांवर महायुतीचे (भाजप १६, शिंदे गट १) उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. रायगडमध्ये महाड पंचायत समितीच्या सवाने धामणे गणातून अनिल जाधव, तर रत्नागिरीतील नाणीज गणातून डॉ. पद्मजा कांबळे यांनी बिनविरोध निवडून येत विजयाची माळ आपल्या गळ्यात घातली आहे.

या निवडणुकांचे निकाल आगामी काळातील राज्याच्या राजकारणाची नांदी मानले जात आहेत. ग्रामीण भागातील जनतेचा कौल कोणाकडे आहे, हे दुपारपर्यंत पूर्णपणे स्पष्ट होईल. सध्या तरी महायुतीने घेतलेली ही आघाडी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरणारी ठरत असून, विरोधी पक्षांना पुढील फेऱ्यांमध्ये मुसंडी मारण्याची आशा आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या