मुंबई- सावली बार प्रकरणावरून अडचणीत आलेले शिंदे गटाचे आमदार व गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या कुटुंबाची या प्रकरणी पुरती नाचक्की झाल्यावर त्यांनी आज सावली बारचा ऑर्केस्ट्राचा परवाना सरकारला परत केला. मात्र, त्यांनी रेस्टोबार आणि हॉटेलचा परवाना अजूनही आपल्याकडे ठेवला आहे. त्यावरूनही विरोधकांनी त्यांना धारेवर धरत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी पुन्हा केली आहे. त्या बारवर तीनदा धाडी पडल्या तरी परवानाधारक कदम कुटुंबावर कारवाई का झाली नाही, असा सवाल उबाठाचे अनिल परब यांनी विचारला.
मुंबईतील कांदिवली येथील सावली बारवर मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी धाड टाकली होती. या बारमधून 22 बारबाला आणि चार कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले होते. या बारचा परवाना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आई ज्योती कदम यांच्या नावावर असल्याचे त्यावेळी उघड झाले होते. विधान परिषदेचे उबाठाचे आमदार अनिल परब यांनी या विषयावर सभागृहात आवाज उठवला होता. त्यांनी या बारचा परवाना योगेश कदम यांच्या कुटुंबियांच्या नावावर असल्याचे सांगून त्याची कागदपत्रे सादर केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगेश कदम यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली होती. या प्रकरणी टीका झाल्यावर योगेश कदम यांचे वडील आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी खुलासा केला होता की, बारचा परवाना माझ्या पत्नीच्या नावावर असला तरी हा बार गेली अनेक वर्षे शेट्टी नावाच्या व्यक्तीला भाड्याने चालवायला दिला आहे. त्यामुळे आपला या प्रकरणाशी थेट संबंध नाही. शिवाय ज्या व्यक्तीला तो भाड्याने दिला होता त्याच्यासोबतचा करारही रद्द केला होता. तर कोकणातील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणून योगेश कदम यांना जाहीर समर्थन दिले होते. मात्र, विरोधकांनी योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. या राजकीय दबावामुळे कदम कुटुंबाने आज सावली बारचा ऑर्केस्ट्रा परवाना सरकारला परत केल्याची माहिती आहे.
हा परवाना परत केल्यानंतरही उबाठा आमदार अनिल परब यांनी कदम कुटुंबावर पुन्हा हल्ला चढवत म्हणाले की, चोराने चोरीचा माल परत केला म्हणजे तो सुटत नसतो. परवाना परत केला म्हणजेच त्यांच्या बारमध्ये अवैध काम चालू होते, हे त्यांनी मान्य केले आहे. या प्रकरणात कायद्याने गुन्हा घडला आहे. ज्या गोष्टीला महाराष्ट्रामध्ये बंदी घातलेली होती ती त्यांच्या घरात सुरू होती. विशेष म्हणजे, बंदी घालण्याची जबाबदारी गृह राज्यमंत्र्यांवर होती. आम्ही केलेल्या आरोपांचे सर्व पुरावे मुख्यमंत्र्यांना सादर केले आहेत. पुरावे त्यांनी तपासावे आणि गृह राज्यमंत्र्यांवर कारवाई करावी आणि त्यांचा राजीनामा घ्यावा. कारण कायद्यानुसार, डान्सबारशी संबंधित कोणत्याही गैरप्रकारासाठी मूळ मालक जबाबदार असतो.
दमानिया कदमांविरुद्ध
कायदेशीर लढाई लढणार
सावली बारचे प्रकरण चर्चेत असतानाच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कदम कुटुंबाविरुद्ध कायदेशीर लढाई लढणार असल्याचे म्हटले आहे. त्या म्हणाल्या की, कदम कुटुंबियांच्या सर्व शैक्षणिक संस्था, कंपन्या, योग, सिद्ध अशा नावाने असलेल्या विविध डेव्हलपमेंट कंपन्यांची कुंडली मी काढली आहे. त्यांच्या कंपन्यांचे कुठे कुठे प्रकल्प सुरू आहेत, त्याचे तपशील, रत्नागिरीमधील त्यांच्या शैक्षणिक संस्थांची संपूर्ण माहिती गोळा केली आहे. माझ्यापर्यंत प्रचंड प्रमाणात माहिती आली आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार समोर आले आहेत. या सगळ्या माहितीचा अभ्यास करून मी त्यांच्या विरोधात न्यायालयात लढा देणार आहे.
