Dharmendra Health Update : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल उलटसुलट चर्चा सुरू होती, त्यातच त्यांच्या निधनाचे वृत्त समाज माध्यमांवर पसरल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आता त्यांची पत्नी हेमा मालिनी आणि मुलगी ईशा देओल यांनी तातडीने पोस्टशेअर करून हे वृत्त संपूर्णपणे खोटे असल्याचे स्पष्ट केले आहे, ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
ईशा देओल आणि हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून अफवा पसरवणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.
ईशा देओलचे स्पष्टीकरण
धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातम्या समोर येताच ईशा देओलने लगेचच पोस्ट करून ही माहिती चुकीची असल्याचे सांगितले. तिने लिहिले: “माझ्या वडिलांची तब्येत स्थिर आहे आणि ते बरे होत आहेत. आम्ही सर्वांना विनंती करतो की, आमच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करावा. बाबा लवकर बरे व्हावेत यासाठी केलेल्या प्रार्थनांबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.”
हेमा मालिनी संतापल्या
ईशाच्या पोस्टनंतर हेमा मालिनी यांनी देखील निधनाच्या वृत्तांना जोरदार फेटाळून लावले. त्यांनी ‘एक्स’ अकाउंटवर पोस्ट करत आपला संताप व्यक्त केला: “या गोष्टीसाठी क्षमा नाही! उपचार घेत असलेल्या आणि बरे होत असलेल्या व्यक्तीबद्दल जबाबदार वाहिन्या खोटी बातमी कशी पसरवू शकतात? हे अत्यंत अनादरयुक्त आणि गैरजबाबदार वर्तन आहे. कृपया कुटुंब आणि त्यांच्या गोपनीयतेचा योग्य आदर करा.”
रुग्णालयात उपचार सुरू
89 वर्षांचे असलेले धर्मेंद्र यांना श्वासोच्छ्वास आणि इतर वैद्यकीय तपासणीसाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले असल्याची पूर्वीची माहिती होती. त्यांची प्रकृती स्थिर असून ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत.
सलमान आणि शाहरुखची भेट
धर्मेंद्र रुग्णालयात असल्याने बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी त्यांची भेट घेतली. अभिनेता सलमान खान याच्यासह शाहरुख खान आणि आर्यन खान यांनीही रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.
‘इक्कीस’ चित्रपट येणार
6 दशकांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत सक्रिय असलेले धर्मेंद्र हे लवकरच दिग्दर्शक श्रीराम राघवन यांच्या ‘इक्कीस’ (21) या युद्धपटात दिसणार आहेत. या चित्रपटात ते अगस्त्य नंदा यांच्यासोबत काम करत आहेत.









