Govinda Health : बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता गोविंदा (वय 61) याला प्रकृती अस्वस्थ झाल्यामुळे काल (11 नोव्हेंबर) रात्री जुहू येथील क्रिटिकेअर रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले आहे. गोविंदा घरी असताना त्याला चक्कर येऊन तो बेशुद्ध पडला. अस्वस्थता (Disorientation) जाणवल्यामुळे ही घटना घडली, अशी माहिती देण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी डॉक्टरांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तातडीने औषधोपचार केले. त्यानंतर मध्यरात्री 1 वाजता गोविंदाला त्वरित रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले.
रिपोर्टनुसार, त्याच्यावर आवश्यक त्या वैद्यकीय तपासण्या (Medical Tests) करण्यात आल्या आहेत. सध्या गोविंदाच्या आरोग्याच्या स्थितीबद्दल अधिक तपशील देण्यात आलेला नाही.
मागील वर्षीची दुर्घटना
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये गोविंदासोबत एक मोठी दुर्घटना घडली होती. त्याच्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून चुकून गोळी सुटल्याने त्याच्या पायाला दुखापत झाली होती. त्यावेळी त्याला तातडीने जुहू येथील क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करून सलग एक तास शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
गोविंदाच्या व्यवस्थापकाच्या माहितीनुसार, पहाटे 5 वाजता तो कोलकात्यातील एका कार्यक्रमासाठी निघत असताना कपाटातून रिव्हॉल्व्हर खाली पडले आणि त्यातून गोळी सुटली होती. ‘मी स्तब्ध झालो आणि माझ्या पायातून रक्ताचा फवारा बाहेर येताना पाहिला,’ असे गोविंदाने रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर सांगितले होते.
हे देखील वाचा – Health Tips : हिवाळ्यात थंड पाणी पिणे हानिकारक आहे का? जाणून घ्या तज्ञांचे मत









