Vijay-Trisha Appearance: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार विजय आणि त्यांची पत्नी संगीता यांच्या घटस्फोटाची बातमी ताजी असतानाच, आता एक नवी चर्चा सुरू झाली आहे. चेन्नईमध्ये नुकत्याच पार पडलेल्या एका हाय-प्रोफाइल विवाह सोहळ्यात विजय आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांनी हजेरी लावली.
विशेष म्हणजे हे दोघेही कार्यक्रमाच्या ठिकाणी एकत्र आले आणि सोबतच तिथून बाहेर पडले, ज्यामुळे चाहत्यांमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
विवाह सोहळ्यातील उपस्थिती आणि व्हायरल व्हिडिओ
एजीएस प्रोड्युसर कल्पथी सुरेश यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यात विजय आणि त्रिशा एकत्र दिसले. विजयने हातामध्ये फुलांचा गुच्छ घेतला होता, तर त्रिशा त्याच्यासोबत अतिशय सहज वावरताना दिसली. दोघांनी स्टेजवर जाऊन नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर एकत्र फोटोही काढून घेतले.
सोशल मीडियावर हे व्हिडिओ व्हायरल होताच चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने म्हटले की, “आता हे अधिकृत वाटतेय,” तर काहींनी त्यांच्या नातेसंबंधावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
संगीता यांचा गंभीर आरोप
विजयची पत्नी संगीता यांनी चेन्नईतील चेंगलपट्टू कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. या याचिकेत त्यांनी विजयवर गंभीर आरोप केले आहेत. “एप्रिल 2021 मध्ये मला विजयचे एका अभिनेत्रीसोबत अनैतिक संबंध असल्याचे समजले, ज्यामुळे मला प्रचंड मानसिक त्रास झाला,” असे संगीता यांनी आपल्या याचिकेत नमूद केले आहे. त्यांनी पुढे असाही आरोप केला की, विजयने अनेकदा परदेशवारी आणि सार्वजनिक कार्यक्रमांना त्या अभिनेत्रीसोबत हजेरी लावली आहे आणि त्यांच्या सोशल मीडिया पोस्टलाही मूक संमती दिली आहे.
विजय आणि त्रिशाचे व्यावसायिक नाते
विजय आणि त्रिशा ही ऑन-स्क्रीन जोडी म्हणून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. ‘घिल्ली’, ‘लिओ’ आणि ‘द गोट’ यांसारख्या चित्रपटांतून ते एकत्र झळकले आहेत. अलीकडेच राजकीय चर्चांमधून त्रिशा यांचे नाव ओढले गेल्यामुळे त्यांनी कायदेशीर नोटीस पाठवून आपल्या नावाचा चुकीचा वापर न करण्याचे आवाहन केले होते.
विजय सध्या त्याच्या राजकीय प्रवासाच्या तयारीला लागले असून ‘तमिळगा वेट्री कळघम’ या पक्षाच्या माध्यमातून ते २०२६ च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. तत्पूर्वी त्याचा ‘जन नायकन’ हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, त्यानंतर विजय पूर्णवेळ राजकारणात सक्रिय होणार आहेत.
हे देखील वाचा – US Waiver for Russian Oil: भारताला मोठा दिलासा! रशियाकडून तेल खरेदीसाठी अमेरिकेची 30 दिवसांची विशेष परवानगी










