Asha Bhosle Death : भारतीय संगीत क्षेत्रातील एक देदिप्यमान तारा निखळला आहे. आपल्या मधाळ आवाजाने सात दशकांहून अधिक काळ रसिकांवर मोहिनी घालणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांनी रविवारी (12 एप्रिल) अखेरचा श्वास घेतला. केवळ एक महान गायिका म्हणूनच नाही, तर एक उत्तम सुगरण आणि अन्नरसिक म्हणूनही त्यांची ओळख होती. संगीतावर जेवढे त्यांचे प्रेम होते, तेवढीच ओढ त्यांना स्वयंपाकाचीही होती.
सिनेसृष्टी त्यांच्या पाककलेची फॅन
आशाताईंनी बनवलेली ‘मां की दाल’ आणि ‘बिर्याणी’ संपूर्ण बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध होती. त्यांच्या या कलेचे कौतुक खुद्द लता मंगेशकर देखील करायच्या. लतादीदींना आशाताईंच्या हाताचे ‘शमी कबाब’ प्रचंड आवडायचे. आशाताई म्हणायच्या की, “गाण्यासारखाच स्वयंपाकही मनापासून आणि प्रेमाने केला पाहिजे, तरच तो समोरच्याला आनंद देतो.”
त्यांच्या पाककलेचे काही खास किस्से:
- मां की दाल: त्यांनी ही खास डाळ पेशावरच्या लोकांकडून शिकली होती आणि ती चव कुठेही मिळणार नाही, असा त्यांचा विश्वास होता.
- मोठे पाहुणचार: चित्रपटसृष्टीतील 60 ते 70 लोकांसाठी त्या दर आठवड्याला मोठ्या पातेल्यात स्वतः जेवण बनवायच्या.
- रेकॉर्डिंग आणि घर: रेकॉर्डिंगवरून घरी परतताना आपल्या मुलांसाठी बिर्याणी किंवा मटण-चिकन बनवण्यासाठी त्या नेहमीच तत्पर असत.
- विविध पदार्थ: त्यांनी अभिनेत्री माला सिन्हा यांच्याकडून ‘मोमोज’, तर राज कपूर यांच्याकडून ‘पेशावरी बिर्याणी’च्या टिप्स घेतल्या होत्या.
रेस्टॉरंट व्यवसायातही यशस्वी
स्वयंपाकाप्रती असलेल्या याच ओढीमुळे त्यांनी 2002 मध्ये दुबईत ‘आशाज’ (Asha’s) नावाचे स्वतःचे रेस्टॉरंट सुरू केले. आज या रेस्टॉरंटच्या शाखा मध्य पूर्व देशांसह युनायटेड किंगडममध्येही पसरलेल्या आहेत. स्वतः ‘शेफ कोट’ परिधान करण्यात त्यांना खूप अभिमान वाटायचा. त्या म्हणायच्या, “हा कोट घातला की मला एखाद्या महागड्या ड्रेसपेक्षाही जास्त आनंद मिळतो.”
आशा भोसले यांनी केवळ संगीतातच अढळ स्थान निर्माण केले नाही, तर त्यांनी अनेकांना प्रेमाने खाऊ घालून माणुसकीची नवी व्याख्याही मांडली. त्यांच्या जाण्याने भारतीय संस्कृती आणि कलेचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे.










