Bill Gates: बॉलिवूड आणि तंत्रज्ञान जगातील एक अनपेक्षित ‘क्रॉसओवर’ सध्या चर्चेत आहे. नुकतेच मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी अभिनेत्री व माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासोबत ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या लोकप्रिय हिंदी मालिकेत विशेष हजेरी लावली आहे.
काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या एपिसोडमध्ये गेट्स यांनी ‘तुलसी’चे पात्र साकारणाऱ्या स्मृती इराणी यांच्यासोबत मातृ आणि बाल आरोग्याच्या महत्त्वावर संवाद साधला. बिल गेट्स फाऊंडेशन अनेक वर्षांपासून उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांमध्ये माता व बालकांच्या आरोग्याच्या सुधारणेसाठी काम करत आहे.
सामाजिक संदेशासाठी निवडले योग्य व्यासपीठ
समाजात आजही रूढीवादी विचार कायम असताना, आरोग्याच्या महत्त्वाविषयी संदेश देण्यासाठी गेट्स यांनी ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या लोकप्रिय मालिकेशी जोडणी साधली. जुलै 2000 मध्ये सुरू झालेली ही मालिका 8.5 वर्षे चालली. आता दुसऱ्या सीझनमध्ये परतलेल्या या मालिकेतील ‘तुलसी’ची भूमिका आजही प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे.
तुलसी आता कुटुंबात सासू बनण्याच्या मार्गावर आहे आणि सध्या ती सामाजिक समस्यांवर अधिक भाष्य करत आहे. स्मृती इराणी यांनी महिला आणि बाल विकास मंत्री म्हणून काम केल्यामुळे, मालिकेत आता घटस्फोट आणि मातृ आरोग्यासारख्या गंभीर विषयांचा समावेश वाढला आहे.
संवादाची सुरुवात
या 4 मिनिटांच्या सेगमेंटची सुरुवात बिल गेट्स यांनी अमेरिकन ॲक्सेंटमध्ये ‘नमस्ते तुलसीजी’ या अभिवादनाने केली. डोहाळजेवण समारंभात गर्भवती महिलेला आरोग्य सल्ला देत असताना तुलसीचा व्हिडिओ व्हायरल (Viral) झाला. हा व्हिडिओ पाहून गेट्स यांनी व्हिडिओ कॉल (Video Call) स्वीकारल्याचे कळताच तुलसीचा मुलगा उत्साहाने ही बातमी देतो.
व्हिडिओ कॉलवर तुलसी गेट्स यांना या पारंपारिक विधीमागचा उद्देश स्पष्ट करते. “आम्ही महिलांना त्यांच्या आरोग्याची, आहाराची काळजी घेण्याबद्दल आणि डिलिव्हरीसाठी रुग्णालयात जाण्याबद्दल सांगतो,” असे ती सांगते. “माता निरोगी असल्या तर मुलांची प्रगती होते आणि जगाचा विकास होतो,” यावर दोघांचे एकमत झाले. गेट्स या मालिकेच्या 3 एपिसोड्समध्ये दिसणार आहेत.









